गाडेचा मोबाईल शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान   

स्वारगेट प्रकरण

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्याकडे सध्या या प्रकरणाचा तपास आहे. आरोपी गाडे याने यापूर्वीदेखील अनेक महिलांचे आक्षेपार्ह छायाचित्र आणि चित्रीकरण केल्याचे चौकशीत समोर आले आहे. ज्या मोबाईलमध्ये गाडे याने चित्रीकरण केले आहे, त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 
आरोपी दत्तात्रय याने त्याचा मोबाइल त्याच्या गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने यापूर्वीदेखील मोबाइलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह छायाचित्र घेतले असून, अनेक चित्रफिती मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत. याच चित्रफिती आणि छायाचित्रांच्या मदतीने तो महिलांना ब्लॅकमेल करायचा, असे तपासात समोर आले आहे. त्यामुळे आरोपीचा महिलांचे चित्रीकरण आणि छायाचित्र असलेला मोबाइल जप्त करून त्याची तपासणे करणे गरजेचे आहे.
 
दत्तात्रय गाडे याने २५ फेब्रुवारीला सकाळी २६ वर्षाच्या पीडितेवर बसचे वाहक असल्याचे सांगून स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेत बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. घटनेच्या तीन दिवसानंतर पहाटे आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले होते. पुणे पोलिसांकडे आरोपीविरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आरोपीने यापूर्वीदेखील असे प्रकार केल्याचे समोर आले असून, पीडित महिला-मुलींनी समोर येऊन गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
आरोपी गाडेसह पोलीस गुनाटमध्ये
 
दत्तात्र्य गाडे या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या पोलीस फौजफाटामध्ये शिरुर परिसरातील गुनाट या त्याच्या मुळगावी तपासाकरिता शुक्रवारी नेले. गाडे हा तीन दिवस पसार असताना नेमका कुठे कुठे लपला होता, त्याने मोबाईल कुठे लपवला आहे. याबाबत तपास करण्यात येत आहे. 

Related Articles