पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांपोटी ३११ कोटींची थकबाकी   

पुणे : महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. मात्र वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू असून गेल्या ३५ दिवसांच्या कालावधीत ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
 
यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांच्या तपासणीचे काम स्वतंत्र पथकांद्वारे सुरु आहे. यामध्ये शेजार्‍यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार (पुणे), स्वप्निल काटकर (कोल्हापूर) व धर्मराज पेठकर (बारामती) उपविभाग व शाखा कार्यालयांना भेटी देऊन थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत. 

Related Articles