शांततेच्या नोबेलसाठी ३०० हून अधिक नामांकने   

डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस, जेन्स स्टॉल्टनबर्ग यांचा समावेश 

वॉशिंग्टन : जगातिक शांततेसाठी बहुमूल्य योगदान देणार्‍या व्यक्ती तसेच संस्थांना नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. नॉर्वेजीयन नोबेल इंस्टिटयूटने यंदा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ३०० हून अधिक व्यक्ती आणि संस्था यांना नामांकित केले आहे.  विशेष म्हणजे यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस आणि नाटोचे माजी सेक्रेटरी जेन्स स्टॉल्टनबर्ग यांची नावे आहेत.
  
एकूण ३३८ नामांकने दाखल करण्यात आली असून, यामध्ये २४४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या २८६ च्या तुलनेत ही संख्या खूपच मोठी आहे. आजवर २०१६ मध्ये विक्रमी ३७६ नामांकने दाखल करण्यात आली होती. नोबेल नियमानुसार नामांकित व्यक्तींची ओळख ५० वर्षांपर्यंत गुप्त ठेवली जाते, परंतु नामांकन करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती त्यांनी कोणाचे नाव नामांकित केले आहे हे जाहीर करू शकतात.
 
ट्रम्प यांच्या नामांकनामुळे चर्चा
   
अमेरिकन काँग्रेस सदस्य डॅरेल इस्सा यांनी समाज माध्यमावर लिहिले, की आपण डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकित केले असल्याचे जाहीर केले आहे. तसेच या पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त पात्र कोणीच नाही असेही त्या म्हणाल्या. इस्सा यांच्या कार्यालयाने सांगितले, की डोनाल्ड ट्रम्प यांना मध्य पूर्वेतील राजनैतिक कार्याच्या आधारावर नामांकित करण्यात आले आहे. मात्र, हे नामांकन अधिकृत वेळ मर्यादा संपल्यानंतर दाखल करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या वर्षीही नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत होते, मात्र यंदा ट्रम्प यांनी त्यांच्या परराष्ट्र नितीमध्ये केलेल्या मोठे बदल, तसेच युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध रोखण्यासाठी केलेले प्रयत्नांमुळे यासंबंधी जोरदार चर्चा सुरू आहे. 
 
कोणती नावे चर्चेत?
 
नॉर्वेजीयन कायदे मंडळातील सदस्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले, की त्यांनी स्टॉल्टेनबर्ग, यूएन सेक्रेटरी जनरल अ‍ॅन्टोनियो गुटेरस आणि पोप फ्रान्सिस यांची नावे नोबेल पुरस्करासाठी नामांकित केले आहे. गाझा, युक्रेन युद्धाच्या झळा सोसत असलेल्या प्रदेशांमधील शांततेसाठी पोप फ्रान्सिस आवाज उठविला आहे. दुसरीकडे फ्रेंच कार्यकर्त्या गिसेल पेलिकॉट यांनाही पुरस्कार मिळावा अशी मागणी होत आहे. जानेवारी महिन्यात यूकेमधील हजारो नागरिकांनी यासंबंधीच्या याचिकेवर स्वाक्षर्‍या केल्या. पूर्वीच्या पतीकडून झालेल्या लैंगिक हिंसाचाराविरोधात धाडस दाखवत उघडपणे बोलल्याबद्दल पेलिकॉट यांचे नाव चर्चेत आले.

Related Articles