पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन   

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुणे दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या हा दोरा आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.पुण्यातील स्वारगेट ते दिवाणी न्यायालय या भूमिगत मेट्रो मार्गाचे उदघाटन आणि स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गाचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते केले जाईल. येत्या २७ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होण्याची शयता आहे.
 
या कार्यक्रमानंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यासंदर्भात मुख्य सचिवांनी  दृकश्राव्य माध्यामाव्दारे विभागीय आयुक्तांची बैठक घेतली. त्या बैठकीत दौर्‍यातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विविध विभागाच्या अधिकार्‍यांची गुरुवारी विभागीय आयुक्तालयात प्राथमिक बैठक घेतली. त्या बैठकीत मोदींच्या दौर्‍याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. बैठकीची अंतिम फेरीसुद्धा होणार असून त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.
 
मेट्रोच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर सभा घेण्यासाठी पुण्यात स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, कृषी महाविद्यालयासह आणखी एका जागेची चाचपणी प्रशासनाकडून सुरू आहे. त्यापैकी मेट्रो मार्गाचे उद्घाटन तसेच भूमिपूजन हे मध्यवस्तीतील रहिवाशांसाठी फायदेशीर आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी पाहता जवळचा मार्ग म्हणून स. प. महाविद्यालयाचे मैदान ही सभेसाठी निश्चित करण्याची शयता वर्तविण्यात आली आहे. मोदी यांचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर सभेचे ठिकाण पुढील बैठकीत निश्चित होणार आहे, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles