महिला उद्योजकांसाठी पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज   

जम्मू-काश्मीरसाठी पाच हमी योजनांची घोषणा

कुटुंबाला २५ लाखांचा आरोग्य विमा

अनंतनाग : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास महिला उद्योजकांसाठी पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज आणि प्रत्येक कुटुंबास २५ लाखांचा आरोग्य विमा दिला जाईल, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी येथे केली.दक्षिण काश्मीरमध्ये आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभेत खर्गे यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेसाठी पाच हमी योजना जाहीर केल्या.
 
यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल, सुबोध कांत आदी उपस्थित होते. पाच हमींची घोषणा करताना खर्गे म्हणाले, काँग्रेस-एनसीचे सरकार कुटुंबातील महिला प्रमुखास दरमहा तीन हजार देईल. तसेच, सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे प्रति व्यक्ती ११ किलो धान्य दिले जाईल. यासोबतच, काश्मीर पंडितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन पूर्ण केले जाईल. ओबीसींनाही राज्यघटनेत नमूद केलेले त्यांचे हक्क मिळतील.
 
खर्गे पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये एक लाख सरकारी जागा रिकाम्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून रिकाम्या जागा भरल्या जात नाहीत. कारण, त्यांना जम्मू आणि काश्मीरमधील जनतेला गरीब ठेवायचे आहे. त्यामुळे सरकारी भरती निघत नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही तातडीने रिकामी पदे भरू, असे आश्वासन दिले. 
 
केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करताना खर्गे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी कोणताही उद्योग आणला नाही. त्यामुळे रोजगार निर्माण झाला नाही. आम्ही पर्यटन आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करू. गेल्या काही वर्षांत ४,४०० हून अधिक सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. आम्ही त्या पुन्हा सुरू करू, असेही खर्गे यावेळी म्हणाले.जम्मू-कश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही खर्गे यांनी यावेळी आश्वासन दिले.

Related Articles