बालगंधर्व रंगमंदिरात कलावंतांचे रंगयात्रा अ‍ॅप विरोधात आंदोलन   

पुणे : शहरातील नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रामधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंग यात्रा’ या मोबाईल अ‍ॅपचा विरोध करण्यासाठी रविवारी अनेक कलावंत एकत्र आले होते. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरासमोर या अ‍ॅपचा निषेध व्यक्त करून ते रद्द करण्याची मागणी केली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, भाग्यश्री देसाई आदी सहभागी झाले होते.
 
महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक केंद्र विभागाच्या वतीने नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रामधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंग यात्रा’ हे मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. पण या ऑनलाइन बुकिंग अ‍ॅपला शहरातील विविध संस्थांनी विरोध केला. कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने अ‍ॅप तयार केले असल्याने ते आम्हाला अमान्य आहे आणि ते त्वरीत रद्द करावे, अशी मागणी ज्येष्ठ कलावंतांनी केली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, भाग्यश्री देसाई, बाबासाहेब पाटील, मेघराज राजेभोसले, सुनील महाजन, समीर हम्पी, सत्यजित दांडेकर, योगेश सुपेकर, सुरेखा पुणेकर, ऋषिकेश बालगुडे, शशिकांत कोठावळे, नाना मोहिते, जतीन पांडे, मोहन कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.
 
या अ‍ॅपमुळे नाटक व्यवस्थापक, निर्माते, कलाकार, लावणी निर्माते, व्यवस्थापक, या सर्वांच्या दृष्टीकोनातून ऑनलाइन बुकिंग अव्यवहार्य ठरणार आहे. ऑनलाइन बुकिंग करत असताना हजारोंच्या घरात जर नाट्यगृहासाठी अर्ज आले, तर कुठल्याही नाट्यगृहाच्या बॅक ऑफिसला हुशार, अनुभवी, सक्षम टीम नाही. त्यामुळे गोंधळ वाढेल, असा आरोप उपस्थितांनी केला. सध्या नाट्यगृहांमध्ये इंटरनेट किंवा वायफायची सुविधा देखील नाही, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बुकिंग केलेल्या संस्थांचे वाटप कसे करणार? ऑनलाइन बुकिंग करताना मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या पैशांच्या जोरावर सर्व बुकिंग अगोदरच करून ठेवतील. त्यामुळे इतर नाट्यसंस्था किंवा कलाकारांना बुकिंग करणे अवघड जाईल, अशी कलावंतांची व्यथा आहे.
 
नाटकाऐवजी खासगी कार्यक्रम अधिक 
 
महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग होणे अपेक्षित आहे; पण तीन जी प्रमुख नाट्यगृहे आहेत, त्यामध्ये नाटकांचे प्रयोग कमी आणि खासगी कार्यक्रम अधिक होत असतात. आज रंगभूमीवर ६० ते ७० नाटके आहेत आणि सर्वच नाटकांना या तीन रंगभूमीवर नाटक सादर करायची इच्छा असते. महापालिकेने आणलेले रंगयात्रा नावाचे अ‍ॅप नाट्यगृह आरक्षणासाठी आहे. ते सर्वांना वापरता येईल. मग जर एखाद्याने संपूर्ण दिवसभर ते बुक केले तर नाटकवाल्यांनी जायचे कुठे? याचा पालिकेने विचार करावा.
- प्रशांत दामले,ज्येष्ठ नाट्यकर्मी

Related Articles