तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह   

चेन्नई : तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकामध्ये सध्या प्रचलित असलेल्या रुपया चिन्हाऐवजी (<) तामिळ भाषेतील रूपया म्हणजेच रुबईचे पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तामिळनाडूचे अर्थमंत्री थंगम थेन्नारासू आज (शुक्रवारी) २०२५-२६ चे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. या अंदाजपत्रकाचा टीझर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. त्याची माहिती देत त्यांनी म्हटले आहे की, ‘समाजातील सर्व घटकांच्या लाभाकरिता तामिळनाडूचा व्यापक विकास करण्यासाठी...’ या टीझरमध्ये सुरूवातीला रुपयाचे बदललेले चिन्ह पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्राद्वारे हिंदी भाषा लादण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे.  दरम्यान, राष्ट्रीय चलनाचे चिन्ह वापरण्यास एखाद्या राज्याने नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. तामिळ अस्मिता आणि प्रादेशिक स्वायत्तता जपण्याचा प्रयत्न म्हणूनही या निर्णयाकडे पाहिले जात आहे. एनईपी आणि तीन भाषांच्या सूत्राला तामिळनाडू सरकार विरोध करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनीही स्टॅलिन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 
 

Related Articles