मढीची यात्रा वादाच्या भोवर्‍यात! (अग्रलेख)   

अन्य तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत मढी या तीर्थक्षेत्राचा अपेक्षेप्रमाणे विकास होवू शकलेला नाही. याला स्थानिक नेतृत्वच जबाबदार आहे; परंतु भाविक केवळ राजकीय भूमिकेतून याकडे पाहत नाहीत. त्यांचा विषय श्रध्देपुरता मर्यादित असतो. 
 
‘भटक्यांची पंढरी’ अशी ओळख असलेल्या मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवास होळी पौर्णिमेपासून प्रारंभ होतो. या यात्रेची राज्यभर ख्याती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हे देवस्थान गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने भरणारा गाढवांचा बाजार तर दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. यात्रेनिमित्ताने भरणारी जातपंचायत आणि त्यात होणारे निर्णयदेखील ऐतिहासिकच ठरतात. गेल्या काही दिवसांत हे देवस्थान वेगवेगळ्या कारणावरून, वेगवेगळ्या विषयावरील चर्चेतून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मढीच्या ग्रामसभेने कानिफनाथ यात्रेदरम्यान मुस्लीम व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यास जागा देणार नसल्याचा ठराव केला होता. त्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने परवा स्थगिती दिली असली तरी उलटसुलट विधांनामुळे हा वाद पेटता राहिला आहे. गेल्या काही दिवसांत धर्मदाय आयुक्त आणि विश्वस्त यांच्यातील नियमांवरून निर्माण होणारा वाद, स्थानिक पातळीवर ग्रामस्थांची भूमिका या दोन गोष्टी वादाचे मूळ कारण ठरत आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने झालेली ग्रामसभा ही वादळी ठरली. ग्रामसभेत मुस्लिम व्यावसायिकांना यात्रोत्सवात सहभागी होण्यास मज्जाव करणारा निर्णय घेतला गेला तोही विषय वादाचा ठरला. त्यात काही राजकीय नेत्यांनी त्याला विरोध केला. त्यातच राज्याचे एक मंत्री ग्रामसभेने केलेल्या त्या निर्णयामागे ठामपणे उभे राहिले आहेत. त्यांनी कोणत्या भूमिकेचे समर्थन करावे हा त्यांचा प्रश्न असेलही मात्र यावरून दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही, हे पाहाणेही महत्त्वाचे ठरते.

पक्षीय राजकारण नको

देवस्थानच्या कारभारात पक्षीय राजकारण नसावे, हे सर्वमान्य असतानादेखील यात राजकीय हस्तक्षेप होणे हे संयुक्तिक नाही. कारण यातून कुठेतरी राजकारण्यांची भूमिका उघड होते आणि त्यातून ग्रामसभेतील निर्णयाला राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. ग्रामस्थांचा निर्णय न्यायालयानेही रद्दबातल ठरवला आणि या वादाला पुन्हा वेगळे वळण लागले. विशिष्ट समाजावर हा अन्याय असल्याची हाकाटी राजकीय गोटातून पिटली गेली आणि वादाची दिशाच बदलली. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक ग्रामस्थांनीही पुन्हा दुसरी ग्रामसभा घेवून पूर्वीचा निर्णय मागे घेत मुस्लिम व्यावसायिकांना यात्रोत्सवात सहभागी होण्यास मुभा दिली. त्यामुळे या विषयावर पडदा पडला. रुढी-परंपरेचे पालन करण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला. वर्षानुवर्ष मढीच्या यात्रेत कोणत्याही जातीधर्माचा द्वेष न करता सर्व लोक गुण्यागोविंदाने यात्रोत्सवात सहभागी होतात. ग्रामसभेने आधीच्या निर्णयाचा फेरविचार केल्याने हा विषय तिथेच संपला; परंतु सर्वानुमते हा विषय मंजूर झाला असला तरी ग्रामसभेत पडलेले दोन गट आणि त्यातून पुढे आलेली मतभिन्नता लपून राहिलेली नाही. दुसर्‍या ग्रामसभेतही या विषयावर चर्चेचा खल झालाच आणि ग्रामसभेच्या एकमुखी निर्णयामुळे अखेर वाद मिटला.  चैतन्य कानिफनाथ देवस्थान हे सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. वर्षभर येथे भाविक केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपर्‍यातून श्रद्धेने येतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या तीर्थक्षेत्राचा अपेक्षेप्रमाणे विकास होवू शकलेला नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीचा तो परिणाम असावा. कारण राज्यकर्त्यांची भूमिका बदलली की विकासाची दिशाही बदलते, ते येथे पहावयास मिळते. हा जिल्हा संतांची पावन भूमी म्हणून ओळखला जातो. स्थानिक विकासावर बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम होतो हे मात्र नाकारून चालणार नाही. वाद काहीही असोत, भाविकांची भावना आणि श्रध्दा याचा विचार करून ते थांबले पाहिजेत. सर्व धर्म समभावाचा नारा देताना ‘भटक्यांच्या पंढरी’ला त्याचा फटका बसू नये एवढीच अपेक्षा!

Related Articles