जागतिक प्रदूषणाच्या यादीत भारतातील तेरा शहरे   

मेघालयातील बायर्निहाट प्रथम, दिल्लीसह भिवंडीचा समावेश

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक प्रदूषण करणारी २० शहरे आहेत. त्यापैकी १३ शहरे भारतातील असून मेघालयातील बायर्निहाट शहर पहिल्या क्रमांकावर आहे, असा एक धक्कादायक अहवाल मंगळवारी प्रकाशित करण्यात आला.स्वित्झर्लंड येथील एअर क्वॉलिटी टेक्नोलॉजी कंपनीने द वर्ल्ड एअर क्वॉलिटीत रिपोर्ट -२०२४ काल प्रकाशित केला. राजधानी नवी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. जागतिक प्रदूषणाच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक पाचवा आहे. २०२३ मध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर होता. सर्वाधिक प्रदूषित शहारांच्या २० देशांच्या यादीत पाकिस्तानातील चार आणि चीनमधील एक शहराचा समावेश झाला.
 
अहवालात स्पष्ट झाले की, गेल्या वर्षी प्रदूषण करणार्‍या कणांच्या प्रमाणात (पीएम २.५ एकक) सात टक्के घट झाली. प्रति चौरस मीटर क्षेत्रात सरासरी ५०.६ सूक्ष्म ग्रॅम एवढे प्रमाण कणांचे आहे. २०२३ मध्ये ते ५४.४ प्रति चौरस मीटर एवढे होते. सर्वाधिक २० प्रदूषित शहरांचा विचार केला तर त्यापैकी १३ शहरे भारतातील आहेत. दिल्लीतील हवेचे प्रदूषण अधिक वाढले आहे. २०२३ मध्ये कणांचे प्रमाण प्रति चौरस मीटर क्षेत्रात १०२.३ सूक्ष्म ग्रॅम होते. ते २०२४ मध्ये वाढून १०८.३ सूक्ष्मग्रॅम एवढे झाले  सर्वाधिक २० शहरांच्या यादीत मेघालयातील बायर्निहाट पहिले असून त्या पाठोपाठ  दिल्ली, पंजाबचे मुल्लानपूर, फरिदाबाद, लोणी, गुरूग्राम, गगनपूर, ग्रेटर नोएडा, भिवंडी, मुजफ्फरनगर, हनुमानगढ आणि नोएडा यांचा समावेश आहे.  एकंदरीत शहरांत प्रदूषणांच्या कणांचे प्रमाण ३५ टक्के वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पीएम२.४ चे प्रमाण १० टक्के वाढल्याचे नमूद केले आहे. प्रति चौरस मीटरमध्ये ५ सूक्ष्मग्रॅमची निर्धारित  पातळी कणांनी केव्हाच ओलाडली आहे. 
 
प्रति वर्षी १० लाख जणांचा बळी
 
गेल्या वर्षी लान्सेट प्लॅनेटरी हेल्थ संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतात २००९ ते २०१९ दरम्यान प्रति वर्षी १० लाख ५० हजार नागरिकांचा बळी प्रदूषणामुळे गेला आहे. प्रदूषणाचे सूक्ष्म कण २.५ मायक्रॉन पेक्षा कमी असतात. त्यांना पीएम २.५ असे संबोधले जाते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हृदयविकार आणि कर्करोगही होतो. शेतातील पाचट किंवा चुलीसाठी लाकूडफाटा जाळणे तसेच वाहनांतून बाहेर पडणारा धुरात सूक्ष्मकण असतात. त्यांचे प्रमाण वाढले आहे.
 
बायर्निहाट कोठे आहे ?
 
मेघालय राज्यात बायर्निहाट शहर आहे. ते मेघालय आणि आसाम सीमेवर असून स्थानिक कारखान्यातून होणारे प्रदूषण तेथे वाढले आहे. त्यामध्ये मद्य निर्मिती, लोखंड आणि पोलाद निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. तेच प्रदूषणाचे प्रमुख कारण बनले आहेत.  
 
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीं काय पावले उचलायला हवीत, यासाठीं मोठी माहिती केंद्र सरकारने गोळा केली आहे. हा प्रयत्न चांगला असला तरी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तशी पावले टाकलेली नाहीत. गरिबांना, महिलांना मोफत आणि अनुदानित गॅस सिलिंडर देण्याची योजना कौतुकास्पद आहे. मात्र, त्याचे प्रमाण अधिक वाढले पाहिजे,.सार्वंजनिक वाहतुकीला  चालना दिल्यास प्रदूषण घटेंल आणि नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास चालना मिळेल. 
 -सौम्या स्वामीनाथन, जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ, मंत्रालयाच्या माजी सल्लागार
 
दिल्लीचे प्रदूषण चिंतेचा विषय
 
दिल्लीचे प्रदूषण जागतिक पातळीवर चिंतेचा बनला आहे. प्रदूषणाच्या यादीत त्याचा दुसरा क्रमांक सध्या असला तरी हिवाळ्यात दिल्ली नेहमीच प्रदूषणाच्या विळख्यात अडकते. कारण या काळात भाताचे तण आणि उसाचे पाचट सर्रास शेतकरी जाळतात. दिल्लीजवळील पंजाब, हरयाना आणि उत्तर प्रदेशासह अन्य ठिकाणी ते जाळण्याचे प्रमाण अधिक आहे.  दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ढासळते. दिल्ली प्रदूषणात अडकते. हवेचे प्रदूषण इतके झाले आहे की, नागरकांच्या आरोग्याचे प्रश्न वाढत चालले आहेत. मानवी आयुष्य ५.२ वर्षांंनी कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Related Articles