आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा   

अंजली दमानिया यांची मागणी

मुंबई : आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणातही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणी सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी केली आहे.आवादा कंपनीला धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयातून आणि धनंजय मुंडे मंत्री असताना सातपुडा बंगल्यावरून धमकी देण्यात आली होती, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
   
अंजली दमानिया म्हणाल्या, आवादा कंपनीकडून खंडणी मागितली जात होती. मे महिन्यापासून खंडणीसाठी पाठपुरावा केला जात होता. त्याच दरम्यान, २८ मे रोजी कंपनीतील कर्मचार्‍यांचे अपहरण करण्यात आले. सातत्याने खंडणी मागितली जात होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयात बोलावून खंडणी मागितली. पाठोपाठ सातपुडा बंगल्यावर बोलावून खंडणीसाठी धमकावण्यात आले. सातपुडा बंगल्यावर बोलावण्यामागचा हेतू स्पष्ट होता की त्यांना कंपनीच्या कर्मचार्‍याला दाखवायचे होते, की आम्ही मंत्र्यांच्या बंगल्यावर बोलावून तुला धमकावू शकतो. याचा अर्थ तुला पैसे द्यावेच लागतील. त्यामुळे यामागे धनंजय मुंडे होते की नव्हते ते देखील स्पष्ट आहे. एकदा नव्हे तर सहा वेळा अशा प्रकारे खंडणी मागण्यासाठी फोन करण्यात आले. त्यामुळे  या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे, असे दमानिया यांनी सांगितले. 

Related Articles