श्री स्वामी समर्थ पालखीचे आज पुण्यात आगमन   

पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात आगमन होत असून बुधवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त १६ मार्चपर्यंत महानगरपालिकेजवळील काँग्रेस भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ होईल. पालखी सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष आहे.
 
यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार पुण्यातील अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र किराड यांना देण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवार दि.१६ मार्च रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, उद्योजक पुनीत बालन, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 
पालखी सोहळ्यात १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता तुकाराम दैठणकर आणि हर्षद कुलकर्णी हे स्वामी भक्तीगीते, १४ मार्च रोजी ७ वाजता लुई ब्रेड अंध-अपंग कल्याण संस्थेचा ऑर्केस्ट्रा साई सातसुर परिवार सांस्कृतिक मंच यांचा कार्यक्रम, १५ मार्च रोजी मुकुंद बादरायणी हे स्वर समर्थ अभंगवाणी, १६ मार्च रोजी योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होईल. उत्सवात सर्व दिवस ‘रक्तदान महायज्ञ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Related Articles