युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला   

रशिया : युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे.हवाई संरक्षण प्रणालींनी रात्रीच्या वेळी १० रशियन प्रदेशांमध्ये ३३७ युक्रेनियन ड्रोन पाडले असल्याची माहिती रशियन सैन्याने मंगळवारी दिली. गेल्या तीन वर्षांत युक्रेनने रशियावर केलेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियामध्ये या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक सुरू आहे.
 
रशियासोबतचे तीन वर्षांचे युद्ध संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी युक्रेनियन शिष्टमंडळ सौदी अरेबियातील अमेरिकेच्या वरिष्ठ राजदूतांना भेटणार असताना हा हल्ला झाला आहे. या हल्ल्याबाबत युक्रेनियन अधिकाऱ्यांकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. २८ फेब्रुवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या वादविवादानंतर सौदी अरेबियातील चर्चा एक नवीन राजनैतिक प्रयत्न दर्शवितात.
 
रशियानेही ड्रोन पाडले
 
रशियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनच्या सीमेपलीकडे असलेल्या कुर्स्क प्रदेशात सर्वाधिक १२६ ड्रोन पाडण्यात आले. या भागातील काही भाग युक्रेनियन सैन्याच्या नियंत्रणाखाली आहेत आणि मॉस्कोमध्ये ९१ ड्रोन पाडण्यात आले. याशिवाय, युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेल्ग्रोड, ब्रायन्स्क आणि व्होरोनेझ आणि रशियाच्या आत खोलवर असलेल्या कलुगा, लिपेत्स्क, निझनी नोव्हगोरोड, ओरियोल आणि रियाझान सारख्या भागातही ड्रोन पाडण्यात आले आहेत. एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला.
 
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन म्हणाले की, रशियन राजधानीकडे जाणारे ७० हून अधिक ड्रोन पाडण्यात आले. मॉस्कोचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांनी सांगितले की, या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि नऊ जण जखमी झाले आहेत. याशिवाय अनेक निवासी इमारती आणि अनेक गाड्यांचेही नुकसान झाले. लिपेत्स्कचे गव्हर्नर इगोर आर्टामोनोव्ह यांनी सांगितले की, या भागातील महामार्गावर आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे.
 
विमान आणि रेल्वे सेवांवर परिणाम
 
सोब्यानिन म्हणाले की, मॉस्कोमधील एका इमारतीच्या छतालाही नुकसान झाले आहे. सहा विमानतळांवरील उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मॉस्कोजवळील डोमोडेदोवो, वनुकोवो, शेरेमेत्येवो, झुकोव्स्की, यारोस्लाव्हल आणि निझनी नोव्हगोरोड प्रदेशातील विमानतळांचा समावेश आहे. मॉस्कोमधील डोमोडेडोवो रेल्वे स्थानकावरून गाड्या काही काळासाठी थांबवण्यात आल्या होत्या, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles