तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार   

अमरावती :आंध्र प्रदेशातील लोकसंख्या वाढीसाठी अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. असे असतानाच तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार रूपये आणि मुलगा जन्माला आल्यास गाय भेट देण्याची घोषणा टीडीपीचे खासदार कालिसेट्टी अप्पला नायडू यांनी केली आहे.
 
कालिसेट्टी अप्पला नायडू हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विजयनगरम येथील राजीव क्रीडा संकुलात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी तिसर्‍या मुलीला जन्म देणार्‍या प्रत्येक महिलेला ५० हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केली. जी महिला मुलाला जन्म देईल तिला गायही भेट दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या पगारातून महिलांना रोख बक्षिसे देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  
 
तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांच्या मते नायडू यांचे विधान आंध्र प्रदेशच्या लोकसंख्या वाढीत एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारी पाऊल ठरेल. मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनीही नायडू यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू म्हणाले, मी कुटुंब नियोजनाची वकिली करत असे. आता मी माझे विचार बदलत असून लोकसंख्या वाढवण्याच्या बाजूने आहे. भारत हा असा देश आहे, ज्याला लोकसंख्येचा सर्वाधिक फायदा होतो.

Related Articles