बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर   

मुंबई : शेती आणि शेतकरी आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदी सांगितल्या. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे. शेतकर्‍यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकर्‍यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या दोन वर्षांत त्यासाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
 
मुद्रांक शुल्कात वाढ 
 
व्यक्तीगत मालकीच्या चार चाकी सीएनजी व एलपीजी वाहनांवर किंमतीनुसार ७ ते ९ टक्के मोटार वाहन कर होता. आता यामध्ये एक टक्क्याने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तीस लाखांवरील किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरही सहा टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्यात येणार आहे. एखाद्या व्यवहारात एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पुरक दस्ताला प्रति पान आता १०० रुपयांऐवजी ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल. अभिकरणातील दस्तासाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क १०० रुपयांवरून एक हजार करण्यात आले आहे.
 
२,१०० रुपयांचे आश्वासन वार्‍यावर
 
लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो. कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून पुन्हा आलो, पुन्हा आलो, असे कडवे ऐकवत अजित पवार यांनी आपल्या अंदाजपत्रकी भाषणाची सुरूवात केली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत’ सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै, २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी, ३३ हजार २३२ कोटी खर्च झाला आहे. २०२५-२६  मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी निधी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतून मिळणार्‍या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, १५०० रुपयांचे मानधन २,१०० रुपये करण्याबाबत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाबाबत अंदाजपत्रकी भाषणात मौन बाळगण्यात आले आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत १० हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ‘लेक लाडकी योजने’अंतर्गत १ लाख १३ हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. 
 
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे, तर संगमेश्वरला संभाजी महाराजांचे स्मारक  
 
मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल. तसेच, येणार्‍या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यांत भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी आणखी ५० कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
 
सर्व लढायांत विजयश्री मिळविणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील, एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे.

Related Articles