रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत   

पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. ती चर्चा सोमवारी खरी ठरली. धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांसह ठाण्यात पक्ष प्रवेश केला.  
 
पुणे लोकसभा आणि त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी पक्षापासून अंतर राखले होते.  मध्यंतरी, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेतली होती. तेव्हापासून  धंगेकर हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकाच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात माजी आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, या नियुक्त्यांमध्ये धंगेकर यांना डावले असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू होती.
 
त्यानंतर धंगेकर यांनी स्वकीयांना डिवचणारे स्टेट्स ठेवले होते. ज्यामध्ये त्यांनी गळ्यात भगवा गमछा परिधान केला होता. धंगेकर यांचा हा सूचित इशारा दिला होता. तसेच, व्हाट्सअप स्टेटस नंतर धंगेकर शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करण्याचा असल्याचे संकेत दिले होते. ज्या पद्धतीने राज्यामध्ये ‘ऑपरेशन टायगरची’ चर्चा आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील शिंदेसेनेकडून ‘मिशन पुणे’ राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. या मिशन पुणे अंतर्गत धंगेकर यांचा पक्षप्रवेश करून घेण्यात मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी सामंत यांनी रवींद्र यांच्या मुलाचा वाढदिवस देखील साजरा केला होता. त्यानंतर धंगेकर यांनी देखील आपण कार्यकर्त्यांची चर्चा करून पक्ष प्रवेशाबाबत काय तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. काल धंगेकर यांनी शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश केला.

Related Articles