विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य   

पुणे : भारताने आयसीसी चॅम्पीयन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर नागरिकांनी रविवारी रात्री जल्लोष केला. यावेळी जल्लोष करताना काही जणांनी थेट पुणे पोलिसांच्या मोटारीवर चढून आक्षेपार्ह हावभाव व हातवारे करून नृत्य केल्याचे पाहायला मिळाले. समाजमाध्यमांवर या नृत्याची चित्रफित पसरल्यानंतर, पुणेकरांनी संताप व्यक्त केला.
 
भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरल्यानंतर देशात अनेक ठिकांनी नागरिकांकडून विजयी जल्लोष पाहायला मिळाला. अनेक नागरिक झेंडे घेऊन भारत माता की जय च्या घोषणा देत फिरताना दिसून आले. पुण्यातही नेहमीप्रमाणे फर्ग्युसन रस्त्यावरील गोपाळकृष्ण गोखले चौकात (गुडलक चौक)  जल्लोष साजरा करण्यात आला. भारताने सामना जिंकल्यानंतर येथे गर्दी झाली होती. या संपूर्ण गर्दीमध्ये अनेक तरुणाईचे टोळके मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले. अनेकांकडून नशेमध्ये नृत्य करण्यात आले. तसेच काही तरुण तर थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. 
 
गोपाळकृष्ण गोखले चौकातील या प्रकारामुळे पोलिसांचा काहीच धाक न राहिल्याचे दिसून आले आहे. शहरात गुन्हेगारी, तोडफोड मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पोलिसांना न घाबरता तरुणाई हुल्लडबाजी करताना दिसते आहे. काही जल्लोष करताना टवाळखोर तरुणाई मोठया प्रमाणात फर्ग्युसन रस्त्यावर आली होती. काही जण नशेत असल्याचे पोलिसांकडून  सांगण्यात आले. दरम्यान, जोरजोरात गाड्यांचे हॉर्न वाजवणे, शिवीगाळ करणे, अश्लील नृत्य करणे असे प्रकार जल्लोषाच्या नावाखाली तरुणाईने केल्याचे दिसून आले. पोलिसांसमोरच हे सर्व प्रकार सुरु होते. मात्र गर्दीला आवर घालताना पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत होते. 
 
एकाला चाकूने मारहाण
 
जल्लोष सुरू असताना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरूणाला चाकूने मारहाण केल्याची घटना समाजमाध्यमावर समोर आली. मारहाणीमध्ये हा तरूण गंभीर जखमी झाला. त्याला चाकुने, पट्ट्याने आणि दगडाने तरुणाला मारहाण केली. या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला. एकीकडे टीम इंडियाच्या विजयानंतर लोक रस्त्यावर उतरुन फटाके फोडून जल्लोष करत होते. तर, डिजेच्या तालावर लोक नाचत होते. दुसरीकडे, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर टोळक्याने एका तरुणावर चाकुने मारहाण केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Related Articles