नागपाड्यातील सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक   

मुंबई : नागपाडा येथे बांधकामाधीन इमारतीच्या तळघरातील पाण्याची टाकी स्वच्छ करणार्‍या चार कामगारांचा रविवारी गुदमरून मृत्यू झाला. या कामगारांना कोणतेही सुरक्षा उपकरण न दिल्याचा ठपका ठेवत दोन पर्यवेक्षकांना सर जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.  अब्दुल दालिम शेख (३५) व अनिमश विश्वास (३३) अशी अटक करण्यात आळेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही पर्यवेक्षक असून ते नागपाडा परिसरातील रहिवासी आहेत. सर. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार धनराज झिपरू महाले यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस पथकाने नागपाडा परिसातून दोघांना ताब्यात घेतले. 
    
नागपाड्यातील डिमटीमकर मार्गावरील बिस्मिल्ला स्पेस या निर्माणाधीन  इमारतीचे तळघर बर्‍याच दिवसांपासून बंद होते. त्यानंतरही कोणतीही तपासणी न करता आरोपींनी पाच कामगारांना साफसफाईसाठी टाकीत उतरवले.  टाकीत उतरवताना त्यांना कोणतेही सुरक्षा उपकरण पुरवण्यात आले नव्हते. टाकीतील अपुर्‍या प्राणवायूमुळे काही वेळातच त्यांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुद्ध पडले. त्यामधील चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पुरहान शेख (३१) या कामगाराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles