सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!   

बीड : हरणाची शिकार करण्यास रोखणार्‍या पिता-पुत्राला अमानुष मारहाण करणार्‍या सतीश भासले उर्फ खोक्या सध्या राहत असलेली झापेवाडी येथील जागा वनविभागाची असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश धोक्रड यांनी दिली आहे.  
 
सतीश भोसले याच्या वेगवेगळ्या चित्रफिती रोज समोर येत असून, त्याच्या गुन्ह्यांचा आकडा वाढत आहे. भोसले हा झापेवाडी येथील वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याचे कुटुंब याठिकाणी वास्तव्यास आहे. ऐवढ्या दिवस वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण असूनही त्याच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 
 
शेकडो हरणे, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार त्याने केल्याचा आरोप आहे. तरीही वनविभाग एवढे दिवस हातावर हात ठेऊन होते. शनिवारी वनविभागाच्या पथकाने भोसले याच्या घरातून वन्यप्राणी पकडण्यासाठी लागणार्‍या जाळ्या, वाघेर आणि वन्य प्राण्यांची चरबी जप्त केली. त्याच्या घरातून वन्य प्राण्यांचे सुकवलेले मांसही जप्त करण्यात आले आहे. शिरूर पोलिसांसोबत वनविभागानेही त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
 
भोसलेची २०२१ मध्येच भाजपकडून हकालपट्टी  भाजप भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव म्हणाले, सतीश भोसलेने भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भटक्या विमुक्त युवा आघाडी राज्य उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र घेतले होते. सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे. तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. भटके विमुक्त प्रवर्ग हा वेगळा आहे. तरीदेखील त्याने चुकीची माहिती सांगून पद मिळवले होते. मला हे कळल्यानंतर मी २०२१ साली त्याची पदावरून हकालपट्टी केली होती. तो पक्ष विरोधी कारवाई, खंडणी, अपहरण असे प्रकार करत असल्यामुळे पक्षाने त्याच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देखील घेतला होता. सध्या तो कुठल्याही पदावर नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Related Articles