भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष   

पुणे : भारत न्यूझिलंड यांच्यातील चॅम्पीयन करंडक अंतिम सामन्यामध्ये भारताने चार गडी राखून विजय मिळवला. या विजयाने पुण्यातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी... इंडिया... इंडिया.... चा जयघोष... भारत माता की जय...डान्स.. पेढा, मिठाईचे वाटप...तर दुचाकींंची फेरी काढत पुणेकरांनी भारताच्या विजयाचा जल्लोष केला.
 
रविवारी आलेल्या अंतिम सामान्यामुळे सकाळपासून क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा होती. याबरोबरच सर्व कामे सकाळी लवकर उरकून घेण्यासाठीची लगबगही पाहायला मिळाली. शहरातील चौका-चौकात एलईडी स्क्रीन लावले होते. तर लग्न मुहुर्त असल्याने काही मंगल कार्यालयातही सामना पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीन लावल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच शहरातील  शोरूम्स, दुकाने, टपरीबाहेर नागरिक सामना पाहत होते. भारताने न्यूझिलंडला पराभवाची धूळ चारल्यानंतर रविवारी देशभरामध्ये विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे.  पुण्यातील फर्ग्यूसन रस्त्यावर तरुणाई भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रात्री दहापासून उशिरापर्यंत रस्त्यावर एकवटली होती. फर्ग्यूसन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तरुणाईचा जल्लोष दिसून आला. 
 
यामध्ये गुडलक चौकात तर भारतमाता की जय, जय भवानी, जय शिवाजी... अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून निघाल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत वेळ फर्ग्यूसन रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत ‘मॅच कोण जिंकणार’ असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.  हातात तिरंगा घेऊन पुण्यातील तरुणाईकडून ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. 

Related Articles