प्राजक्ताची फुलं...   

विरंगुळा, श्रीकांत तारे 

काही घटनांची कारणं शोधण्यात अर्थ नसतो; परंतु असंही घडतं कधी कधी. माझ्या घरासमोरील शंभर फुटी रस्ता ओलांडला, की दोन-तीन खोपटी दिसतात. पाच वर्षांपूर्वी हा मुख्य रस्ता तयार झाला तेव्हा काही मजुरांनी तिथे हंगामी घरं तयार करून घेत आपल्या कुटुंबांची सोय करून घेतली होती. यातील काही कुटुंबांनी रस्त्याचं काम संपल्यानंतरही त्यांचं बस्तान कायम ठेवलं. त्यांचे संसार तिथेच फुलले, विस्तारले. त्यापैकी समोर दिसणार्‍या घरातील बाई चार घरी धुणी भांडी करते, तिचा नवरा कुठल्याशा कंपनीत वॉचमन आहे. त्यांच्या घरात सात-आठ वर्षाची एक मुलगी, दोन वर्षाचं एक गोड बाळ. या मुलीची खूप इच्छा होती म्हणून पूर्वी कधीतरी मी तिच्यासोबत सरकारी शाळेत गेलो, शाळेचं अल्पसं शुल्क भरून तिचं नाव शाळेत घातलं. वर्षभर बरं चाललं, पण तिला लहान भाऊ झाला आणि त्याला सांभाळण्यासाठी तिची पूर्णकालीन नेमणूक झाली.
 
झालं, स्त्री शिक्षण, समान संधी वगैरे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वगैरे संकल्पना आपसूकच बारगळल्या. मी केला प्रयत्न तिला या जबाबदारीतून मोकळं करून तिचं शिक्षण पुन्हा सुरु करायचा; पण माझ्याच बायकोनं, ‘तुम्हाला काय करायचंय, ती पोरगी जाणे आणि तिचे आई-बाप जाणे’ असा दम मला दिला आणि मी गप्प बसलो. ही मुलगी सहसा कुणाच्या घरात जात नाही. ती आणि तिच्या हातातील बाळ इतकंच विश्व आहे तिचं; पण ती प्रथम आमच्या घरात शिरली, तो क्षण मला स्पष्ट आठवतोय. हिवाळ्याची सुरुवात होती आणि आमच्या अंगणातील प्राजक्ताचं झाड बहरलं होतं. पहाटेला प्राजक्ताची काही फुलं अंगणाबाहेर पडायची, पण फुलांचा खरा सडा पडायचा अंगणात. आमच्या अंगणाला भिंत नाही. मला आवडतं म्हणून किंवा गावाकडील घराची आठवण कायम राहावी म्हणून त्याला काटेरी कुंपण करून घेतलंय. अंगणाबाहेर आणि अंगणात पडलेली प्राजक्ताची फुलं आमच्या खिडकीतूनही सहज दिसतात. 
 
त्या दिवशी सकाळी खिडकीत उभा राहून मी चहाचे घोट घेत होतो, आणि खिडकी बाहेरील हालचाल मला स्पष्ट दिसत होती. कानोसा घेत ही मुलगी माझ्या घरच्या जाळीच्या फाटकापाशी आली, फाटकातून तिनं आत बघितलं, तिच्या अपेक्षेप्रमाणे प्राजक्ताच्या झाडाखाली पांढर्‍या केशरी फुलांचा सडा पडला होता. आवाज न करता हळूच तिनं फाटक उघडलं, चारीकडे नजर टाकली आणि चोर पावलांनी ती आत शिरली. प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेली शेकडो फुलं बघून तिच्या चेहर्‍यावरील भाव पालटले, चेहर्‍यावरील भीती नष्ट होऊन तिच्या चेहर्‍यावर तीच प्राजक्ताची फुलं उमलली, चेहरा फुलांहून अधिक प्रफुल्लीत झाला. फ्रॉक सावरीत ती गुडघ्यावर बसली आणि फुलं वेचू लागली, तोवर फुलांनी त्यांच्या सुगंधाचा दरवळ आवरून ठेवलेला असावा. आतापर्यंत न जाणवलेला प्राजक्त फुलांचा सुगंध चहुंदिशी दरवळला. तिनं घातलेल्या फ्रॉकची ओंजळ करत एक एक फुल निवडून ती त्यात गोळा करू लागली.
 
एखाद्या फुलावर माती किंवा मुंगी तत्सम काही असल्यास त्यावर नाजूक फुंकर घालून, त्यास स्वच्छ करून मगच ते फुल ती स्वीकार करीत होती. शुद्ध केलेल्या या फुलांनाही त्याक्षणी कृतकृत्य वाटत असेल असं उगाचच वाटलं मला. अनिमेष नेत्रांनी मी तिची हालचाल तिच्या नकळत टिपत राहिलो. प्राजक्ताच्या फुलांच्या नजाकतीनं ती फुलं गोळा करीत होती. ‘काळजी करू नका, माझ्या घरी मी छान सजवून ठेवेन हं तुम्हाला!’ असंही ती त्या फुलांना सांगत असावी! झाडाला घट्ट धरून बसलेली काही मुजोर फुलं नंतर तिचा हात न लागल्याचा पस्तावा करीत बसतील याची खात्री होती मला. 
 
जमिनीवर पडलेली फुलं संपायला आली तेव्हा झाड हलवून आणखी काही फुलं तिला पाडून द्यावीत अशा शुद्ध विचारानं मी खिडकी सोडून दाराबाहेर पडलो. माझी चाहूल लागली आणि घाबरून, फ्रॉक सावरीत उठलीच ती. त्यातील काही फुलं जमिनीवर सांडली. मी चेहरा शक्य तितका हसरा केला. घाबरू नकोस बेटी, रोज घेऊन जात जा फुलं. आणखी हवीत का? मधाळ स्वरांत मी विचारलं. तिच्या चेहर्‍यावर स्मित आलं, नजरेतून दोन निरांजनं चकाकली, त्या निरांजनीच्या मंद प्रकाशानं दाही दिशा उजळून निघाल्या. मी पापणीही न लवता त्या बाळाची हालचाल टिपत होतो. पोरीचं लक्षच नव्हतं माझ्याकडे, 
फुलं वेचायला या घरात शिरताना आता आपल्याला भिण्याचं कारण नाही या जाणीवेनं ती निश्चित झालेली वाटत होती. तिला हवी तेवढी फुलं वेचून झाली आणि ती उठून उभी राहिली. खोपटातून तेवढ्यात तिच्या आईची हाक आलीच आणि ती वळली, माझ्याकडे बघून, मंद स्मित करीत वेगानं फाटकाबाहेर निघून गेली. ‘मी उद्याही येणार आहे’ हे आश्वासन तिनं त्या स्मितातून मला दिलं असा अंदाज मी माझाच लावून घेतला.
 
काय मनात आलं ठाऊक नाही, पण मी नकळत पुढे झालो, तिच्या फ्रॉकमधून सांडलेली, तिच्या हाताचा स्पर्श झालेली काही फुलं गोळा केली, जमिनीवर पडलेली फुलं देव्हार्‍यात सजवायची नाही असं कुठेतरी वाचलं असल्यानं घराच्या प्रवेशदाराशेजारी भिंतीत कोनाडा तयार करून त्यात गणपतीची सुबक मूर्ती ठेवली आहे, त्याच्या पायाशी ती फुलं ठेवली. तळहातावर साचून राहिलेला प्राजक्ताचा गंध हुंगला, मोठा श्वास घेऊन तो सुगंध फुफ्फुसात भरून घेतला आणि ‘उद्या सकाळी या बाळाला फुलं निवडायला मदत करायची’ असा विचार करीत घरात शिरलो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठायला उशीरच झाला मला. चहा वगैरे आटोपेपर्यंत आठ वाजून गेले होते, दरम्यान कालच्या मुलीची आठवण आली म्हणून पटकन दार उघडलं, संवयीनं दाराशेजारील गणपतीला हात जोडले आणि.... आणि बघतच राहिलो. 
 
मूर्तीच्या पायाशी काल वाहिलेली प्राजक्ताची फुलं तशीच होती, काल इतकीच ताजी. प्राजक्ताच्या नाजूक फुलांचं चार-सहा तासांत निर्माल्य होतं, त्या लाजर्‍या बिटीयाचा स्पर्श झालेली ही फुलं मात्र चोवीस तासांनंतरही टवटवीत होती. या फुलांना गोळा करणार्‍या मुलीइतकीच टवटवीत. पाहून मी आश्चर्यात बुडून गेलो,असं कसं घडू शकतं याचा विचार करीत बसलो. काही घटनांची कारणं शोधण्यात अर्थ नसतो परंतु असंही घडतं कधी कधी.

Related Articles