राज्यावरील कर्जाचा भार ८ लाख कोटींच्या पुढे   

आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्याचा २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. यंदा राज्याचा विकास दर ७.३ टक्के अपेक्षित असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत तो कमी असणार आहे. चांगल्या पावसामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर मागच्या वर्षीच्या तुलनेत खूपच चांगला राहणार असला, तरी उद्योग आणि सेवा या दोन क्षेत्रांमध्ये गतवर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. राज्यावरील कर्जाचा भार मागच्या वर्षभरात तब्बल दहा टक्क्यांनी वाढला असून कर्जाचा भार ८ लाख कोटीवर गेला आहे.
 
अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर केला. या अहवालानुसार, देशाचा विकास दर ६.५ टक्के अपेक्षित असताना, महाराष्ट्राचा विकास दर त्यापेक्षा अधिक राहील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. राज्यात सरासरीच्या ११६ टक्के पाऊस पडला होता. यामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर यंदा ८.७ टक्के अपेक्षित  आहे. मागच्या वर्षी तो साडेतीन टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. उद्योग व सेवा क्षेत्रात मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे. उद्योग क्षेत्राचा विकास दर ४.९ टक्के अपेक्षित आहे. मागच्या वर्षी उद्योग क्षेत्राचा विकास दर ६.२ टक्के होता. २०२४-२५ साठी राज्याची महसुली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी, तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी अपेक्षित होता. वर्षाच्या सुरुवातीला २० हजार कोटींची महसुली तूट अपेक्षित होती. परंतु, महसुली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ही तूट दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.
 
दरडोई उत्पन्नात वाढ 
 
•  दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावर असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. २०२३-२४ मध्ये  राज्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपये होते. यंदा दरडोई उत्पन्न ३ लाख ९ हजार ३४० रुपये होईल, असा अंदाज आहे. दरडोई उत्पन्नात मराठवाड्यातील जिल्हे शेवटच्या स्थानावर  या आर्थिक वर्षात राज्यावरील कर्जाचा भार ७ लाख ८२ हजार कोटींपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा होती.  पण, हा आकडा आठ लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. या वर्षी कर्जाची परतफेड व व्याज देण्यासाठी तब्बल ५६ हजार ७२७ कोटी खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Related Articles