दीड कोटी घरगुती ग्राहकांनाही मिळणार मोफत वीज : मुख्यमंत्री   

मुंबई, (प्रतिनिधी) : बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून राज्यातील ४५ लाख शेतकर्‍यांना सध्या मोफत वीज देण्यात येते. या माध्यमातून १६ हजार मेगावॅट वीज देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत कृषिपंपांना शंभर टक्के वीज सोलरच्या माध्यमातून दिवसा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, १०० युनिट पर्यंत वीज वापरणारे राज्यात ७० टक्के म्हणजे दीड कोटी ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी देखील सोलर योजना आणत आहोत. त्यामुळे या दीड कोटी ग्राहकांची देखील वीज बिलातून मुक्तता केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
 
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या. राज्याला मोठ्या प्रमाणात विजेची गरज लागणार आहे. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल बनणार आहे. डेटा सेंटरला वीज हीच प्रामुख्याने लागणार आहे. त्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून २० लाख घरे देण्यात येणार आहेत. ही सर्व घरे सोलर पॅनेलने युक्त असतील. त्यामुळे या वीस लाख घरांची देखील वीज बिलातून मुक्ती होणार आहे.  डिसेंबर २०२६ पर्यंत ़कृषिपंप हे सोलरवर चालतील. त्यामुळे शेतकर्‍यांना देखील वर्षाचे ३६५ दिवस ते ही दिवसा वीज मिळणार आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. गावातील रस्तेही खराब होत असतात. त्यामुळे आता १ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या  ४ हजार गावांना जाणारे रस्तेही काँक्रीटचे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 
 
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही 
 
• हल्ली प्रसारमाध्यमांत सातत्याने बातम्या येतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी घेतलेल्या निर्णयांना मी स्थगिती दिली. स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी देखील त्यांच्यासोबत होतो. अजित पवारही होते. त्यामुळे त्या निर्णयांची जबाबदारी फक्त शिंदे यांची नाही, आम्हा तिघांची आहे. एखाद्या प्रकरणात जर काही विषय असेल, तर आम्ही तिघेही चर्चा करतो आणि निर्णय घेतो, असेही ते म्हणाले.

Related Articles