टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात   

पुणे : युरोप, अमेरिकेत उद्योग आणि शिक्षण क्षेत्राचा मोठा विकास झाला आहे. त्याचे कारण म्हणजे ही दोन्ही क्षेत्रे तेथे एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र वाटचाल करतात. त्यामुळे देशात उद्योग आणि शिक्षण क्षेत्रांनी क्रांती घडवून आणायची असल्यास, या दोन्ही क्षेत्रांनी एकत्रित वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रविंद्र प्रभुदेसाई यांनी केले.पितांबरी उद्योग समूह टिळक महाराष्ट्र विद्यापीठासोबत काम करण्यास उत्सुक आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.  
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४२ वा पदवीप्रदान सोहळा काल मुकुंदनगर येथील टिमविच्या संकुलात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, व कायनेटिक ग्रीन एजर्जी अँड पॉवर सोल्यूशन्सच्या संस्थापक व कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 
या प्रसंगी टिमविच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती टिळक, सरिता साठे, सुवर्णा साठे यांसह विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. पदवीप्रदान समारंभात १२ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १ हजार ६६ तर पदवी अभ्यासक्रमाच्या २ हजार ६८ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच, कौशल्य विकास शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या १४३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सुवर्णपदके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 
प्रभुदेसाई म्हणाले, हे स्पर्धेचे युग असून उत्पादनाचा विकास ही काळाची गरज आहे. उद्योजक नेहमी मेहनत करत असतात. वर्षानुवर्षे काम करत असतात. मात्र, समाज त्यांच्याकडे ‘ऑल टाइम मनी मशीन’अशा नजरेने पाहतो. उद्योजकही सामाजिक जबाबदारीचे भान राखणारे नागरिक असतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात उत्तम दर्जाचा उच्चांक गाठला आहे. या विद्यापीठाला १०४ वर्षांची परंपरा आहे. जी चांगली विद्यापीठे आहेत, त्यांच्या सोबत काम करण्याची आमची इच्छा असल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले. 
 
कृत्रिम बुद्धीमत्ताचा (एआय) वापर जाहिरातीसाठी केल्यास त्याचा खूप फायदा होईल. मात्र, आजही मराठी माणूस जाहिरात म्हणजे खर्च, असे मानतो. खरे तर, जाहिरात ही गुंतवणूक आहे. एका जाहिरातीच्या माध्यमातून हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहचता येते. महिलांनीच ‘पितांबरी’ हे नाव मोठे केले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील ज्या विविध शाखा आहेत. त्या शाखांसोबत ‘पितांबरी’ जोडली गेल्यास शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नक्कीच सकारात्मक कार्य करता येईल. ‘पितांबरी’ला ‘टिमवि’सोबत काम करायला आवडेल, असेही प्रभुदेसाई यांनी सांगितले.
 
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, शिक्षण व्यवस्थेत अभ्यासक्रमावर भर दिला जातो. मात्र, विद्यार्थ्यांच्या अभ्यासेत्तर गुणांचे कौतुक केवळ बालपणीच केले जाते, हे दुर्दैवी आहे. शिक्षणातून केवळ बौद्धिक वाढ नव्हे, तर भावनिक आणि संवेदनशील विकासही साधला गेला पाहिजे. शिक्षण व्यवस्थेत हे महत्त्व अधोरेखित करणारा दृष्टिकोन असणे आवश्यक आहे, असे मत यावेळी डॉ. आगाशे यांनी व्यक्त केले.
 
डॉ. आगाशे म्हणाले, ‘माणसाचा वैचारिक मेंदू वाढल्यानंतर शिक्षण बुद्धिनिष्ठ होत गेले आहे. मात्र, शिक्षण व्यवस्थेने बौद्धिक वाढीबरोबरच संवेदनशील मन घडवणे गरजेचे आहे. शिक्षण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना भावनांची आणि संवेदनांची योग्य ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बौद्धिक विकासासोबतच भावनिक शिक्षणालाही तितकेच महत्त्व दिले गेले पाहिजे, शिक्षणाने विद्यार्थ्यांचा बौद्धिक, संवेदनशील आणि भावनिक विकास घडवणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील प्रत्येक अभ्यासक्रमात भावनिक शिक्षणाचा समावेश करणे आवश्यक आहे. सध्याची तरुण पिढी भावनिक गोंधळाचा सामना करत आहे. त्यामुळे बालवयापासून त्यांना संवेदनाक्षम शिक्षण दिल्यास भावना ओळखणे, त्यांचा योग्य वापर करुन गैरवापर टाळणे शक्य होईल. या माध्यमातून अनेक सामाजिक समस्या सोडविता येतील, असे डॉ. आगाशे म्हणाले.
 
सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि फिरोदिया कुटुंबात देशप्रेम, आत्मनिर्भरता आणि समाज सेवा या तीन गोष्टींचे साम्य आहे. आमचे कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून अत्याधुनिक परवडणारी वाहने तयार करत आहे. आज आम्ही कायनेटिकच्या माध्यमातून इलेक्ट्रिक गतिशीलतेला प्राधान्य देत आहोत. परवडणारी वाहतूक हा केवळ पर्याय नाही, तर जबाबदारी आहे. प्रदूषण, तपमानवाढ हा जगासमोरील मोठा प्रश्न आहे. 
 
आमची इलेक्ट्रिकल वाहने ही केवळ हरित नाहीत, तर सर्वांना परवडणारी आणि उपयोगी आहेत. इलेक्ट्रिकल दुचाकी, तीनचाकी, माल व प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांच्या माध्यमातून आम्ही केवळ शहरापुरते नाही, तर ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचलो आहोत. इलेक्ट्रिकल वाहनांत पेट्रोलचा खर्च शून्य आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक सर्वांना परवडणारी प्रदूषणमुक्त वाहने हेच आमचे ध्येय आहे. परवडणार्‍या व प्रदूषणविरहित वाहनातून आम्ही देशाच्या विकासात भर घालत आहोत. 
 
डी.लिट. हा सन्मान माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. हा सन्मान माझ्या एकटीचा नसून संपूर्ण कुटुंब आणि समूहाचा आहे. हा सन्मान मी माझ्या कुटुंबाला सर्मर्पित करते. भविष्यात आपल्या एकत्रित प्रयत्नाने सामाजिक बदल घडवून आणू याची मला खात्री आहे. कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी विद्यापीठातील विविध विभागांचा आढावा घेतला. प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे यांनी प्रास्ताविक केले. स्वप्निल पोरे यांनी डॉ. मोहन आगाशे यांच्या मानपत्राचे, प्रा. अतिफ सुंडके यांनी सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांच्या मानपत्राचे, प्रा. अनुजा पालकर यांनी रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.

Related Articles