‘बब्बर खालसा’चे महाकुंभ होते लक्ष्य   

लखनौ : पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंधित बब्बर खासला इंटरनॅशनलच्या एका सक्रिय दहशतवाद्याला (बीकेआय) गुरुवारी पहाटे उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळा बीकेआयचे लक्ष्य होते. त्यासाठी दहशतवादी हल्ल्याची योजना बीकेआयने आखली होती, असे पोलिस तपासात समोर आले आहे.
 
उत्तर प्रदेशातील विशेष कृती दल (एसटीएफ) आणि पंजाब पोलिसांनी काल पहाटे सव्वातीनच्या सुमारास संयुक्त कारवाई करत लाजर मसीह या दहशतवाद्याला पकडले. मसीह हा अमृतसरच्या कुर्लियान गावचा रहिवासी आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशाचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.मसीह याने प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्यात दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. पण, सरकार आणि प्रशासनाने महाकुंभसाठी  कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर तो बनावट पासपोर्टच्या आधारे पोर्तुगालमध्ये आश्रय घेण्याच्या प्रयत्नात होता, असेही कुमार यांनी सांगितले. 
 
मसीह याच्याजवळून काही स्फोटक सामग्री आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तो पाकिस्तानातील तीन आयएसआय एजंट्सच्या संपर्कात होता. मध्यंतरी, त्याला एका प्रकरणात अटक झाली होती. मात्र, ४ सप्टेंबर २०२४ रोजी अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयातून तो पळून गेला होता. काही दिवसांपूर्वीच तो उत्तर प्रदेशात परतला होता. त्याआधी, तो काही काळ सोनीपत आणि दिल्लीमध्ये वास्तव्यास होता.पाकिस्तानातून ड्रोनच्या साहाय्याने शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ पाठविले जात असल्याची कबुली मसीह याने दिली आहे. बीकेआयच्या कार्यकर्त्यांना ही सामग्री पाठविण्याचे काम मसीह करत असे. पिलीभीतमध्ये चकमकीत मारला गेलेला दहशतवादी वीरेश सिंग उर्फ रवी याच्याही तो संपर्कात होता, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles