संजय राऊत, रोहित पवार यांच्याविरोधात हक्कभंग   

मुंबई, (प्रतिनिधी) : ज्या प्रकरणात ८ वर्षांपूर्वी न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता केली आहे; ते प्रकरण काढून आपल्यावर बेफाम आरोप करून बदनामी केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गुरूवारी ‘सामना’, ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सदस्य रोहित पवार, ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोरे यांचे हे तिन्ही हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत ते विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याचा निर्णय घोषित केला.
 
गोरे यांच्यावर एका महिलेशी संबंधित अनेक आरोप करण्यात आले होते. ऐन अधिवेशनात हे आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली होती. राऊत यांनी देखील याबाबत वक्तव्य केले होते. ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनेलवर देखील याबाबतच्या बातम्या सातत्याने दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे, गोरे यांनी संजय राऊत, रोहित पवार आणि तुषार खरात या तिघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केले. 
 
हे प्रस्ताव मांडताना जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्हा न्यायालयातील हे २०१७ मधील प्रकरण आहे. त्या प्रकरणाचा आधार घेत माझ्यावर बेछूट आणि खालच्या पातळीवरील आरोप करण्यात आले. माझी जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. माझी न्यायालयाने या प्रकरणातून २०१९ मध्येच निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील रेकॉर्ड देखील नष्ट करण्यास न्यायालयाने सांगितले होते. मात्र, तरीही ‘लय भारी’ हे चॅनेल म्हणते की, या रेकॉर्डमधील ८७ चित्रफिती त्यांच्याकडे आहेत. न्यायालयाने रेकॉर्ड नष्ट केल्यानंतरही त्यातील गोष्टी यांच्याकडे कशा उपलब्ध आहेत? हा न्यायालयाचा अवमान नाही का ? असा सवाल गोरे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडताना केला. 
 
या प्रकरणात राज्यपालांनाही निवेदन दिल्याचे सांगण्यात आले. त्या निवेदनावर ज्याची स्वाक्षरी आहे, ती व्यक्ती म्हणते मी स्वाक्षरी केलेलीच नाही. मग, राज्यपालांना खोटे बनावट पत्र देण्यात आले का? असेही गोरे म्हणाले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आता ‘सोशल मीडिया’ हा अनियंत्रित झाला आहे. त्यामुळे हा हक्कभंग तात्काळ दाखल करून घ्या आणि अधिवेशन संपेपर्यंत त्यावर निर्णय घ्या, अशी मागणी केली.
दोषी असेन तर फासावर लटकवा : जयकुमार गोरे 
 
• माझ्या वडिलांचे निधन झाले होते. अस्थी विसर्जनही झाले नसताना माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. दशक्रियाविधीपर्यंत थांबण्याची नीतिमत्ताही दाखविण्यात आली नाही. त्यात काही या सभाग़ृहातील सदस्य, बाहेरील लोक यांचाही समावेश आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना नाहक त्रास देण्याचा यातून प्रयत्न झाला. मी सामान्य कुटुंबातून संघर्ष करून पुढे आलो आहे. माझे नेतृत्व संपविण्याचा यांचा डाव होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे, की या प्रकरणाचा तपास करा, मी जर यात दोषी आढळलो, तर मला फासावर चढवा, असे जयकुमार गोरे म्हणाले.

Related Articles