बस स्थानकांत सुरक्षा व्यवस्थेचा अभाव   

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील बस स्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणानंतर सर्व बस स्थानकांचे ऑडिट करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार या अहवालात सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रृटी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.  
 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील १४ आगारांतर्गत येणार्‍या ४२ स्थानकांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाले आहे. सर्व स्थानकावर सुरक्षारक्षक, सुरक्षा भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था या गोष्टींची कमतरता आढळून आली आहे. हा अहवाल एस. टी.च्या मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यात आला आहे. पुणे विभागातील ४२ बसस्थानकांत प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, सुरक्षा भिंत आदी गोष्टी तपासण्यात आल्या. मात्र बहुतांश बस स्थानकावर या गोष्टींचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षा ऑडिटमध्ये या सर्व गोष्टी तेथे असाव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे.
 
पुणे हे राज्यातील महत्वाचे शहर आहे. त्यामुळे शहरातून राज्याच्या कानाकोपर्‍यात बस धावत असतात. तसेच येतही असतात. जिल्ह्यातील विविध बस स्थानकातूनही रोज प्र्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या प्रवाशांच्या सुरक्षेकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष असल्याची बाब समोर आली आहे. येत्या काळात स्वारगेट सारखी घटना पुन्हा बस स्थानकात घडणार नाही, यासाठी बस स्थानकात सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्याची नितांत गरज आहे. 

Related Articles