दगडांच्या चित्रांमधून साकारले गांधीजींचे जीवनकार्य   

पुणे : रंग-रेषांनी चित्रे रेखाटताना आपण नेहमीच पाहतो. मात्र आजूबाजूला आढळणार्‍या विविधरंगी दगडांमधून चित्रांचे वेगळे जग निर्माण करण्याचा कलाविष्कार लेखिका अनिता दुबे यांनी केला आहे. दुबे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन दगडांच्या चित्रांमधून उभे केले आहे. गांधीजींच्या केवळ जीवनदर्शनाचा अनुभव न देता त्यांच्या जीवनकार्याचा अनुभव या चित्रांमधून येतो. मूळच्या भोपाळ येथील अनिता दुबे सध्या पुण्यातील खराडी येथे वास्तव्यास आहेत. लहानपणापासून खडे आणि विविधरंगी व आकाराचे दगडे वेचण्याच्या आवडीतून त्यांनी दगडांपासून चित्र काढण्याची कला विकसित केली. या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन गांधी भवन येथे करण्यात आले आहे. 
 
या प्रदर्शनाचे उद्घाटन  माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, विश्वस्त सचिव अन्वर राजन यावेळी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवारपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.  लहानपणी नर्मदेच्या पात्रातील विविधरंगी आणि वेगवेगळ्या आकाराचे गोट्यांचा संग्रह करण्याची सवय लागली. घरांमध्ये खूप गोट्यांचा संग्रह झाल्याने त्याच्याआधारे वेगवेगळ्या डिझाइन मी करू लागले. त्यातूनच चित्र साकारण्याची कल्पना सुचली, असे दुबे यांनी सांगितले. 

Related Articles