संकलित मूल्यमापन चाचण्या एकाचवेळी   

पुणे : राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा, संकलित चाचणी दोन आणि नियतकालिक मूल्यांकन एकाच वेळी होईल. ८ ते २५ एप्रिल हा कालावधी त्यासाठी निश्चित करण्यात 
आला आहे.
 
सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा, हे यामागील उद्देश आहेत. सर्व माध्यमे आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना ते लागू असेल. या इयत्तांच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस किंवा एप्रिलमध्ये होतात. एप्रिलच्या सुरवातीस वार्षिक परीक्षा झाल्यानंतर शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती पुरेशी नसते. त्यामुळे सर्व शाळांमध्ये एकवाक्यता यावी म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे वेळापत्रक जाहीर केले आहे.शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (पॅट) होणार आहेत. त्याला अनुसरून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-एक, संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन चाचण्या घेण्यात येतात.
 
‘संकलित मूल्यमापन चाचणी दोन’साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल. त्यासाठी ‘एससीईआरटी’ने वेळापत्रक दिले आहे. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांना ‘पॅट’अंतर्गत इयत्ता तिसरी ते नववीच्या प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) विषयांसाठी संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका ‘एससीईआरटी’च्या कार्या-लयाकडून पुरविण्यात येतील.इतर व्यवस्थापनांच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्याच्या आहेत. पहिली आणि दुसरीसाठी सर्व विषयांच्या आणि तिसरी ते नववीच्या अन्य विषयांच्या संकलित चाचणी-दोन लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे, नववीच्या ‘पॅट’शिवाय अन्य विषयांसाठी शाळा स्तरावरून वेळापत्रक ठरवावे, अशी सूचना ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी दिली आहे.

Related Articles