पीएमपीएमएलसाठी एक हजार बसची खरेदी   

पुणे : पीएमआरडीएने पीएमपीएमएलसाठी ५०० बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने अनुक्रमे ३०० आणि २०० बसेस उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएला दिले आहेत. पीएमआरडीए ५०० बसेस उपलब्ध करून देणार असल्याने यापुढे पीएमपीएमएलच्या संचालनातील तूट भरून देण्याची पीएमआरडीएची जबाबदारी कमी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीमध्ये अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. भोसले, अतिरिक्त आयुक्त तथा पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. हे देखिल उपस्थित होते. या बैठकीमध्ये पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने ताफ्यात एक हजार बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, की पीएमपीच्या ताफ्यात सध्या केवळ दोन हजार बसेस आहेत. आयुर्मान संपल्याने ३०० बसेस कमी कराव्या लागणार आहेत. शहरासाठी ६ हजार बसेसची गरज आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एक हजार बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व बसेस सीएनजीवर धावणार्‍या असतील. यापैकी ५०० बसेस पीएमआरडीएने उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तर पीएमपी कंपनीच्या हिस्सेदारीनुसार पुणे महापालिकेने ३०० तर पिंपरी चिंचवड महापालिकेने २०० बसेस उपलब्ध करून द्यायच्या आहेत. या बसेस घेताना शक्यतो भाडेतत्त्वावर घ्याव्यात. तसेच मनुष्यबळाची उपलब्धता पाहूनच घ्याव्यात, अशी सूचना देखिल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

Related Articles