लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस   

पुणे: लाडकी बहीण योजनेत कोणताही नवीन निकष नाही. काही बहिणींनी त्या निकषाबाहेर गेल्या असल्याने त्यांनी योजनेचा लाभ घेणे सोडले. आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
पुणे दौर्‍यात हिंदू गर्जना केसरी स्पर्धेच्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी पत्रकार परीषदेत ते बोलत होते. स्पर्धेचे आयोजक धीरज घाटे आणि उद्योजक पुनीत बालन यावेळी उपस्थित होते. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात प्रश्न विचारले असता, फडणवीस म्हणाले, ‘आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडीयन आहोत, आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावे लागते. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो निश्चित बंद केला जाईल, त्याची आम्ही सुरुवात केली आहे.
 
योजनेसाठी कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळा ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः हून आम्ही निकषा बाहेर गेलो असल्याचे सांगत योजनेचा लाभ घेणे सोडले आहे. आम्ही कोणाकडून पैसे परत घेणार नाही. आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावे लागते.  त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो थांबविला जाईल. जे नियमाच्या बाहेर फायदा घेताय त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहेे, असे फडणवीस म्हणाले.
 
सोलापूरकर यांच्यावर कारवाई?
 
अभिनेता राहुल सोलापुर यांच्या वादग्रस्त विधानाविषयी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोलले पाहिजे. त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचे वर्णन किंवा इतिहासाचे विकृतीकरण हे कोणाच्या हाताने होऊ नये. यासंदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे. त्यासंदर्भात जी काही योग्य कारवाई होईल.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्ली विधानसभेत भाजपला मिळालेले यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने दाखविलेला विश्वास आहे, असे नमूद केले. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. सातत्याने खोटी आश्वासन देऊन आणि  ज्या प्रकारे त्यांनी राज्य केले त्या परंपरेचा अंत झालेला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेले आहे. दिल्लीतील विजय म्हणजे विकासाला दिलेल मत आहे. भाजपचे सरकार तेथील जनतेच्या आशा, आकांक्षा निश्चित पुर्ण करेल. राहुल गांधी यांच्याकडून होणार्‍या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. दिल्लीत काही मिळणार नाही हे लक्षात आले होते, त्यामुळे हरल्यानंतर काय बोलायचे हे राहुल गांधी यांनी ठरविले होते. त्यांचे सध्या कव्हर फायरींग सुरु आहे.

Related Articles