टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण यश   

डेहराडून : सातत्यपूर्ण कामगिरी करणार्या महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकर जोडीने अग्रमानांकित गुजरातला २-० ने नमवून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 
परेड मैदानाजवळील टेनिस संकुलात झालेल्या या स्पर्धेत आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकरने एकेरीचा प्रत्येकी एक सामना जिंकला. आकांक्षा हिने एकेरीच्या पहिल्या लढतीत झील देसाई या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर ६-३, ३-६, ६-३ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्राला या सामन्यात १-० अशी आघाडी मिळाली. हा विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या महाराष्ट्राच्या वैष्णवी हिने वैदेही चौधरी या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा ६-३, ६-३ असा सरळ सेट्समध्ये दणदणीत पराभव केला आणि महाराष्ट्राच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. आकांक्षा हिने पहिल्या सेटमध्ये पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत सर्व्हिस ब्रेक मिळविला. दुसर्‍या सेटमध्ये तिला स्वतःच्या सर्व्हिस व परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत झील हिने दुसरा सेट घेतला आणि सामन्यातील उत्कंठा वाढविली.
 
मात्र तिसर्‍या सेटमध्ये पुन्हा आकांक्षा हिला सूर गवसला. शेवटपर्यंत खेळावरील आपले नियंत्रण कायम राखत आकांक्षा हिने ही लढतही जिंकून महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली.पहिली लढत जिंकल्यामुळे महाराष्ट्राची बाजू बळकट झाली होती. वैष्णवी हिनेदेखील वैदेही विरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच नियंत्रण कसे राहील याचे नियोजन केले होते. पहिल्या सेटमध्ये बेसलाईनवरून परतीच्या खणखणीत फटक्यांबरोबरच तिने बिनतोड सर्व्हिसचा बहारदार खेळ केला. 

Related Articles