२०२७ मध्ये चांद्रयान-४ मोहीम   

नवी दिल्ली : भारत २०२७ मध्ये चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी चांद्रयान-४ मोहीम सुरू करेल, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरूवारी सांगितले. चांद्रयान-४ मध्ये एलव्हीएम-३ रॉकेटचे दोन वेळा वेगवेगळे प्रक्षेपण केले र्जांल. जे मोहिमेचे पाच वेगवेगळे घटक वाहून नेतील आणि ते कक्षेत एकत्र केले जातील, असेही मंत्री सिंह यांनी म्हटले आहे.
 
चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे, असे सिंग यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.ते पुढे म्हणाले, गगनयान मोहिमेत भारतीय अंतराळवीरांनी विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे समाविष्ट आहे, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू केली जाईल.२०२६ मध्ये भारत समुद्रयान मोहीम हाती घेणार आहे. यामध्ये तीन शास्त्रज्ञांना खोल समुद्रात ६,००० मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून समुद्रतळाचा शोध घेण्यासाठी नेले जाईल.
 
ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या इतर महत्त्वाच्या मोहिमांच्या वेळेनुसार होईल, जी देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग ठरेल, असेही सिंह यावेळी म्हणाले. गगनयान प्रकल्पातील ’व्योमित्र’ या रोबोटला घेऊन जाणारी पहिली नॉन-क्रू मोहीम देखील या वर्षी होईल, असेही त्यांनी सांगितले. भारताचे अंतराळ अर्थव्यवस्थेचे मूल्य ८ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. हे पुढील दशकात ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे जागतिक अंतराळ महासत्ता म्हणून भारताची भूमिका आणखी मजबूत होईल, असेही ते म्हणाले.

Related Articles