अन्य धर्माच्या १८ कर्मचार्‍यांना तिरुपती देवस्थानने हटवले   

अमरावती : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या १८ कर्मचार्‍यांना हटवले आहे.देवस्थान समितीने कर्मचार्‍यांसाठी नवा ठराव संमत केला आहे. त्यानुसार केवळ हिंदू कर्मचारीच मंदिरात काम करणार आहेत. मंदिर समितीने घेतलेला हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद १६ (५) वर आधारित आहे. संविधानातील या तरतुदीनुसार धर्मसंस्था, मंदिरे, धार्मिक स्थळे या ठिकाणी त्याच धर्माचे लोक नोकरीसाठी असावेत. ठरावानुसार मंदिरात काम करणार्‍या १८ कर्मचार्‍यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्यासमोर आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीचा पर्याय स्वीकारा किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्या, असे दोन पर्याय ठेवले आहेत.
   
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये वायएसआर सरकार असताना शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असा आरोप केला होता. त्यानंतर आता याच मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचार्‍यांना हटवलं आहे. दरम्यान., या मंदिर प्रशासकीय सेवेत जे ७ हजार कर्मचारी कायमस्वरुपी तत्त्वावर नोकरी करतात. त्यांच्यापैकी ३०० जण हे हिंदू नाहीत. त्यामुळे त्यांनाही स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम हे स्वतंत्र सरकारी विश्वस्त मंडळ आहे. जगातल्या श्रीमंत मंदिरांमध्ये तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश आहे.

Related Articles