व्यापाराला स्वयंपूर्ण करणारे अंदाजपत्रक   

विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया 

पुणे : अंदाजपत्रकात व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीने अनेक सकारात्मक गोष्टीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात व्यापार आणि लघुउद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून व्यापाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे हे अंदाजपत्रक व्यापाराला आत्मनिर्भर करण्यासाठी पायाभरणी करणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी शनिवारी व्यक्त केली. 
तेलबिया, डाळीच्या उत्पन्न वाढीचा निर्णय स्वागतार्ह
 
व्यापारासह अर्थव्यवस्थेला गती देणारे हे अंदाजपत्रक आहे. तसेच तेलबिया व डाळीचे उत्पन्न वाढीचे नियोजन स्वागतार्ह आहे. जीएसटी व आयकराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या महसुलात जी वाढ होत आहे त्या दृष्टीने कर कमी करून कर भरणार्‍याला सवलत देण्याचे काम शासनाने केले आहे. मध्यमवर्गाचा कराचा वाचणारा पैसा पुन्हा बाजारात खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी वापरला जाईल. 
- रायकुमार नहार, 
अध्यक्ष, दि पुना मर्चटस् चेंबर.
 
व्यापाराला चालना देणारे अंदाजपत्रक
 
व्यापार आणि उद्योगाला चालना देणारे हे अंदाजपत्रक आहे. डाळी उत्पादनाच्या बाबतीत देश आत्मनिर्भर होणार असल्याचा संकल्प करण्यात आला आहे. करदात्यांना सुखद धक्का दिला आहे. कर्करोगाचे औषधे कस्टम ड्युटीतून वगळली आहेत. देशातील सर्वात मोठा घटक हा सर्वसामान्य आहे. त्यांना दिलासा मिळाला आहे. सर्व क्षेत्राला न्याय देणारे हे अंदाजपत्रक आहे. 
- प्रवीण चोरबेले, 
माजी अध्यक्ष, दि पुना मर्चंटस चेंबर 
 
करदात्यांसाठी फायदेशीर 
 
अंदाजपत्रकात १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलेे आहे. ही बाब स्तुत्य आहे. आयकर भरण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. डाळींच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी विशेष योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तूर, उडीद आणि मसूर उत्पादनासाठी ६ वर्षांची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. २५ जीवनावश्यक वस्तु करमुक्त करण्यात आलेल्या आहेत. मिरची, हळद, धने व खाद्यतेल या वस्तू करमुक्त होणे आवश्यक आहे. 
- वालचंद संचेती, 
अध्यक्ष, दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स (महाराष्ट्र)
 
व्यापाराला गती देणारे अंदाजपत्रक
 
छोट्या तसेच मध्यम स्वरूपाच्या व्यापाराला गती देणारे हे अंदाजपत्रक आहे.   नोकरदारांसाठी १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट करण्यात आली आहे. या वेळी करदात्यांना अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या परंतु सरकार पुढील आठवड्यात आयकराचे नवीन विधेयक आणणार असल्याने ही प्रतीक्षा वाढली आहे. 
- महेंद्र पितळीया, 
सचिव, पुणे व्यापारी महासंघ.
 
खेळणी उद्योगावर भर 
 
भारतातील बाजारपेठेत चिनी आयात केलेल्या खेळण्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात खेळणी उद्योगावर भर देण्यात आला आहे. स्थानिक उत्पादनाला चालना दिल्याने लघु उद्योजकांना पाठबळ मिळेल. स्वदेशी खेळाच्या निर्मितीत कार्यरत असणार्‍या भारतीय संस्थांना विस्तार आणि प्रगतीची संधी देईल. अनुकूल धोरणे, या क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन, कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधांची उपलब्धता केवळ देशाअंतर्गत उत्पादन वाढवणार नाहीत तर भारताला जागतिक खेळणी बाजारातील महत्त्वाचा भागीदार बनवतील.
- अनिरुद्ध राजदेरकर,
’मावळा’ या खेळाचे निर्माते
 
प्रचीन ग्रंथांना सरंक्षण 
 
प्राचीन ग्रंथांच्या डिजीटाइजेशन, सुरक्षा व संवर्धनासाठी भरीव आर्थिक तरतुद स्वागतार्ह आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या उपयोगामध्ये, प्राचीन ग्रंथांच्या माहितीचा खूप सकारात्मक उपयोग होईल. प्राचीन ग्रंथांचे यानिमित्ताने जतन होण्यास मदत होईल. 
- राजेंद्र बाठिया, 
अध्यक्ष, श्रुतदीप रिसर्च फाऊंडेशन 

Related Articles