महागाईला तेलाची फोडणी   

वृत्तवेध 

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्यात आली होती. त्याचा परिणाम सातत्याने दिसून येत होता. खाद्यतेलाच्या दरात ३ ते ११ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, चालू वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत घट झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात खाद्यतेलाची आयात चार वर्षांमधील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. तज्ज्ञांच्या मते, खाद्यतेलाची आयात कमी होण्याचे मुख्य कारण जास्त आयात शुल्क हे असेल. आगामी काळात आयात शुल्कात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. आयात शुल्क वाढवण्याचा उद्देश स्थानिक शेतकर्‍यांना आधार देणे हा आहे; मात्र आयात आणि साठवणूक कमी झाल्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, सोया तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीमध्ये घट झाल्यामुळे भारताच्या खाद्यतेलाची आयात फेब्रुवारीमध्ये चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. पाम तेलाची आयात जानेवारीमध्ये जवळपास १४ वर्षांच्या नीचांकावरून सुधारली आहे. सलग दुसर्‍या महिन्यात नेहमीपेक्षा कमी आयातीमुळे जगातील सर्वात मोठ्या वनस्पती तेल खरेदीदाराच्या स्टॉकमध्ये घट झाली आहे आणि भारताला येत्या काही महिन्यांमध्ये खरेदी वाढवण्यास भाग पाडले जाऊ शकते. पाम तेलाची आयात मागील महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ३६ टक्क्यांनी वाढून तीन लाख ७४ हजार टन झाली आहे. फेब्रुवारीमध्ये सोया तेलाची आयात एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी घसरून दोन लाख ८४ हजार टन झाली आहे. सूर्यफूल तेलाची आयात २२ टक्क्यांनी घसरून दोन लाख २६हजार टन झाली आहे. ही पाच महिन्यांमधील सर्वात कमी आयात आहे. सोया तेल आणि सूर्यफूल तेलाच्या कमी शिपमेंटमुळे फेब्रुवारीमध्ये देशातील एकूण खाद्यतेल आयात बारा टक्क्यांनी कमी होऊन आठ लाख ८४ हजार  टन झाली. फेब्रुवारी २०२१ नंतरची ती सर्वात कमी आयात आहे. ‘सनविन ग्रुप’चे ‘सीईओ’ संदीप बाजोरिया यांनी सांगितले की परदेशात वाढलेल्या किमती आणि स्थानिक खाद्यतेलाचा अतिरिक्त पुरवठा यामुळे रिफायनर्सना फेब्रुवारीमध्ये आयात कमी करण्यास प्रवृत्त करण्यात आले. डीलर्सच्या अंदाजानुसार फेब्रुवारीमधील कमी आयातीमुळे भारतातील खाद्यतेलाचा साठा एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी कमी होऊन १ मार्चपर्यंत १.६ दशलक्ष टन झाला आहे. तो चार वर्षांपेक्षा अधिक काळातील सर्वात कमी आहे.

Related Articles