अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार   

नवी दिल्ली : आयपीएल सुरु होण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी बाकी असताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने  त्यांचा कर्णधार  निवडला आहे. दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार म्हणून अक्षर पटेलच्या नावाची घोषणा केली आहे.  यापूर्वी रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. आता रिषभ पंत लखनऊ सुपर जाएंटस संघात गेल्याने  नवी दिल्ली नवा कर्णधार शोधावा लागला. टी २० विश्वचषक आणि चॅम्पियन्स चषकात चांगली कामगिरी करणार्‍या अक्षर पटेलवर कर्णधार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  
 
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला १४ कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार केएल राहुल होईल, अशी शक्यता होती. केएल राहुलला कर्नधारपद देण्याचा दिल्ली कॅपिटल्सचा विचार होता. मात्र, केएल राहुलने ती ऑफर नाकारली होती. यामुळे दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर २ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करत  जाहीर केले की अक्षर पटेल संघाचे नेतृत्व करेल.  
 
अक्षर पटेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये खेळला आहे. आयपीएलच्या १५० सामन्यांमध्ये अक्षर पटेलने १३०.८८ च्या स्ट्राइक रेटने आणि २१.४७ च्या सरासरीने १६५३ धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने गोलंदाज म्हणून ७.२८ च्या इकोनॉमीने २५.२ च्या स्ट्राइक रेटने १२३ बळी घेतल्या. २१ धावात ४ बळी ही  अक्षर पटेलची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. अक्षर पटेलने भारतीय क्रिकेट संघात देखील चांगली कामगिरी केली आहे. 
 
भारताने वेस्ट इंडिजमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात टी २० विश्वचषक जिंकला होता. त्यामध्ये अक्षर पटेलची ऑलराऊंडर म्हणून कामगिरी महत्त्वाची ठरली होती. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स चषकात देखील अक्षर पटेलने महत्त्वाच्या आणि मोक्याच्या क्षणी संघाला बळी मिळवून दिल्या. भारताच्या फलंदाजीमध्ये अक्षर पटेलला पाचव्या स्थानावर खेळवण्याचा निर्णय देखील संघ व्यवस्थापनाने घेत त्याच्यावर विश्वास दाखवला. आता अक्षर पटेल दिल्ली आयपीएलच्या विजेतेपदापर्यंत घेऊन जाण्यात यश मिळवतो का ते पाहावे लागेल. 

Related Articles