युद्धबंदीची तत्त्वे मान्य; शांतता कायमस्वरुपी नांदावी : पुतीन   

एक महिन्याच्या युद्धबंदीला नकार

मॉस्को : युक्रेनसोबत एक महिन्याची युद्धबंदी करण्याचा अमेरिकेच्या प्रस्तावातील तत्वे मान्य आहेत, असे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सांगितले आहे. तसेच प्रस्तावातील अटी आणि शर्थीवर अधिक काम करुन त्याद्वारे कायमस्वरुपी शांतता निर्माण व्हायला हवी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. एकंदरीत पुतीन यांनी एक महिन्याच्या युद्धबंदीचा  प्रस्ताव फेटाळल्याचे मानले जात आहे.  
 
एक महिन्याच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पुतीन म्हणाले, तुमची कल्पना बरोबर आहे आणि आम्ही पाठिंबा देतो. पण, काही मुद्दयावर आम्हला चर्चा करायची आहे. मला असे वाटते त्यावर अमेरिकन सहकारी आणि भागिदार यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. युद्धबंदी करार लागू करण्यासाठी करारातील काही मोकळ्या वाटांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. युद्धबंदीच्या एक महिन्याच्या कालावधीत युक्रेन आपली शक्ती आणि शस्त्रास्त्रे गोळा करणार आहे का ?  लढाई थांबविण्याचा प्रस्ताव रशियाला मान्य आहे. पण, तो केवळ ३० दिवसांपुरता मर्यादित नको. युद्धास कारणीभूत ठरणारे मूळ नष्ट करुन  शांतता कायमस्वरुपी नांदली पाहिजे. 
 
युद्धबंदी स्वीकारावी, यासाठी अमेरिकेने युक्रेनचे मन वळविले आहे. युद्धानंतरच्या परिस्थिती पाहता लढाई बंद होणे युक्रेनच्या हिताचे ठरणार आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या क्रूक्स परिसरात हल्ला केला. आता तेथे युक्रेनचे सैन्य अडकले आहे. त्याची या परिसरात पूर्णत: कोंडी झाली आहे. त्यामुळे ३० दिवसांची युद्धबंदी युक्रेनच्या पथ्यावर पडणारी आहे. तेथील सैनिकांना लढल्याशिवाय माघार घेता येणार नाही, असे पुतीन यांनी सांगितले. 

मोदींसह अनेक नेत्यांचे आभार

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदी व्हावी, यासाठी प्रयत्न करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीन, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. युद्धबंदीसाठी वरील देशांची नेतेमंडळी अधिक मोलाची भर टाकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच नाटोच्या कोणत्याही सदस्याला युद्धबंदींनंतरच्या शांतता कार्यात  पाहणीं करण्याची अनुमती रशिया देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
 

Related Articles