पेपरफुटीमुळे ८५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात : राहुल   

नवी दिल्ली : पेपर लीक हे सरकारचे ’सिस्टिमिक फेल्युअर’ आहे. हे तेव्हाच संपेल जेव्हा सर्व राजकीय पक्ष आणि सरकार आपले मतभेद विसरून एकत्र कृती करतील, असे मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केले. तसेच पेपरफुटीमुळे सहा राज्यातील ८५ लाख मुलांचे भवितव्य धोक्यात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
 
एका बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर पोस्ट केले, सहा राज्यातील ८५ लाख मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. पेपर लीक आमच्या तरुणांसाठी सर्वात धोकादायक ’पद्मव्यूह’ बनले आहे. पेपर फुटल्याने कष्टकरी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनिश्चितता आणि तणावात ढकलले जातात. त्यांच्या मेहनतीचे फळ हिरावून घेतले जाते. यातून पुढच्या पिढीला चुकीचा संदेश दिला जातो. मेहनतीपेक्षा अप्रामाणिकपणा चांगला असू शकत नाही.

हे व्यवस्थेचे अपयश 

नीटचे पेपर लीक होऊन एक वर्षही उलटले नाही. आमच्या विरोधानंतर नरेंद्र मोदी सरकारने नवीन कायद्याच्या मागे लपून त्याला तोडगा काढला, परंतु अलीकडच्या पेपर लीकच्या अनेक प्रकरणांमुळे हे सरकार देखील याला रोखण्यास अपयशी ठरले आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांनी आणि सरकारांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येऊन यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. या परीक्षांचा सन्मान राखला गेला पाहिजे, हा आपल्या मुलांचा हक्क आहे, त्याचे रक्षण केलेच पाहिजे, असे राहुल यांनी स्पष्ट केले.
 

Related Articles