निरोगी आरोग्यासाठी देशी बी-बियाणे वाण महत्त्वपूर्ण   

बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे प्रतिपादन

पुणे : बदलत्या आधुनिक युगात निरोगी आरोग्यासाठी परंपरागत देशी बी-बियाणे व वाण महत्त्वपूर्ण उपयोगी असल्याचे प्रतिपादन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी विविध उदाहरणांसह ग्रामीण व बदलत्या शहरी जीवन शैली व दुष्परिणामासह उकल करून स्पष्ट केले.
 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महिला बचतगट विभागामार्फत बचत गटातील महिलांचा स्नेह मेळावा व गौरव समारंभाचे बुधवारी बँकेत आयोजन करण्यात आले होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन बीजमाता पोपेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, संचालक विकासनाना दांगट, प्रविण शिंदे, निर्मलाताई जागडे, कुमारी पुजाताई बुट्टे पाटील, बँकेचे वरिष्ठ अधिकारी, महिला स्वंयसहायत्ता बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
या कार्यक्रमता ३५० महिलांनी सहभाग घेतला. निधी संकलन आणि भागिदारी स्वंय शिक्षण संस्थेच्या संचालक मंजुषा कदम यांचे ‘आरोग्यमयी स्त्री’ या विषयांवरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हेमा यादव यांनीही स्त्री प्रबोधनपर मार्गदर्शन केले. नाबार्डच्या जनरल मॅनेजर स्मृती भगत यांनी स्त्रियांसाठी उपयुक्त शासकीय योजनांची माहिती दिली. जिल्हा बँक व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी खाद्य महोत्सवाच्या माहितीपटाचे अनावरण प्रा. दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेशी संलग्न असलेल्या महिला बचतगटांची यशोगाथा चित्रफितीच्या मार्फत दाखविण्यात आली. तसेच जिल्ह्यातील १५ तालुक्यातून ३० उत्कृष्ट बचतगटांची निवड करून बचतगटांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी दिली.

Related Articles