पुरंदर विमानतळाबाबत कोणतीच घोषणा नाही   

पुणेकरांची निराशा; हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर

पुणे : सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात पुरंदर विमानतळ प्रकल्पा विषयी काही ठोस घोषणा अपेक्षित होत्या. मात्र अर्थमंत्री पुण्याचे असून देखील विमानतळाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या अंदाजपत्रकाकडून पुणेकरांची मोठी निराशा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुरंदर प्रकल्पाच्या सद्य:स्थिती बद्दल पुणेकरांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे नेमके काय काम सुरू आहे. याची माहिती द्यावी, अशी अपेक्षा हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी व्यक्त केली आहे. 
 
नवी मुंबई, नागपूर, शिर्डी, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली येथील विमानतळाबाबत चालू असलेल्या, मान्यता दिलेल्या निधी व विकास कामांची माहिती अंदाजपत्रकात देण्यात आली. ही विमानतळ लवकर कार्यरत होण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे स्वागतच आहे. अमरावती विमानतळा वरून ३१ मार्च २०२५ ला उड्डाण सुरू करण्याचे नियोजन असल्याची घोषणा उत्साहवर्धक आहे. परंतु मोठी मागणी असलेल्या अकोला येथील शिवनी विमानतळ कधी पर्यंत सुरू होईल अथवा तेथील विकास कामांची काय स्थिती आहे याची काही विशेष माहिती अर्थमंत्र्यांच्या भाषणात मिळाली नाही.
 
गेल्या काही वर्षात राज्य अनुभवीत असलेली राजकीय अस्थिरता, बहुपक्षीय युती सरकारमुळे निर्णय घेण्यात येणार्‍या अडचणी, करावयास लागणार्‍या तडजोडी इत्यादीं मुळे मोठ्या काळापासून रखडलेल्या परंतु महाराष्ट्रासाठी गेम चेंजर असलेल्या पुरंदर विमानतळाबाबत मात्र सरकारने कसलीच घोषणा केली नाही. अत्यंत वेगाने विकसित होणार्‍या भारतातील हवाई वाहतूक क्षेत्राने देशास उद्योगाच्या फार मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पाहता, नागरी हवाई उद्योगाशी संबंधित मोठे प्रकल्प राज्यात येणे गरजेचे आहे. देशातील सर्वात जास्त विमानतळ व धावपट्ट्या असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नागरी हवाई वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता पाहता या क्षेत्रात भरीव विकास करण्याची मोठी संधी महाराष्ट्रात आहे. 
 
राज्यात सध्या बंद असलेली अकोला, सोलापूर, रत्नागिरी, धुळे, अमरावती इत्यादीं सारखी विमानतळ लवकर सुरू झाल्यास, त्याचा मोठा फायदा येथील स्थानिक बाजारपेठांना होईल. आपले राज्य हवाई वाहतूक क्षेत्रात मागे राहू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने काल सुसंगत व भविष्यवेधी असे नागरी हवाई वाहतूक धोरण तयार करावयास हवे. राज्यातील हवाई वाहतूक सेवा अधिक शाश्वत व सक्षम होण्यासाठी, पुरंदर सारखे रखडलेले महत्त्वाचे विमानतळ प्रकल्प मार्गी लागण्यासाठी, तसेच नाशिक, छत्रपती संभाजी नगर व शिर्डी विमानतळांवरून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्यासाठी राज्य सरकारने आता अधिक गांभीर्याने प्रयत्न करावयास हवेत, असेही धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले.

Related Articles