पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार   

पुणे : शहरातून बाहेरगावी जाणार्‍या खासगी बस रस्त्यांवर थांबत असल्याने होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या बस पीएमपीच्या डेपोत ठरवीक वेळेत थांबण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडे (पीएमपीएमएल) पाठविण्यात येणार आहे.शहरातून बाहेरगावी जाणार्‍या खासगी बस रस्त्यावर थांबतात. त्यामुळे होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी त्यांना पीएमपी डेपोत ठरावीक वेळेत थांबण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आहे. शहरातून राज्याच्या कानाकोपर्‍यात जाणार्‍या खासगी बस सकाळी, सायंकाळी, तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावरच थांबलेल्या असतात. त्यामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने हा प्रस्ताव तयार करून पीएमपी प्रशासनाकडे पाठविण्याचे निश्चित केले आहे.
 
पुणे हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातूनही लोक पुण्यात येतात. तसेच जातही असतात. मात्र, या प्रवाशांची वाहतूक करणारी खासगी बस आकाराने मोठ्या असल्याने त्या रस्त्यावरच थांबविल्या जातात. या सर्व खासगी बसचा प्रवास शहरातील वेगवेगळ्या भागांतून होतो. काही बस कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाने कात्रजवरून स्वारगेटला येतात. त्यानंतर हडपसरवरून सोलापूर, नांदेड, लातूरकडे जातात. तर काही बस गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर, वाकडेवाडी, संगमवाडी, नगर रस्त्यावरून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जातात. शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रवाशांना घेण्यासाठी या बस जागोजागी थांबतात. पौड रस्ता, वाकडेवाडी, शिवाजीनगर, स्वारगेट चौक, नगर रस्त्यावर या बस थांबत असल्याने वाहतूक कोंडी होते.
 
बाहेरगावी जाणार्‍या खासगी बसला रस्त्याच्या कडेला उभे राहू न देता, शहरातील मोकळ्या जागांवर थांबण्याची परवानगी दिल्यास ही कोंडी टाळता येईल. शहरात विविध ठिकाणी पीएमपीचे डेपो आहेत. तेथे काही वेळेसाठी या बस थांबण्याची परवानगी द्यावी, असा हा प्रस्ताव आहे. यासाठी महापालिकेकडून ‘पीएमपी’ प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.

Related Articles