शाबासकी नको; पण बदनामी करू नका   

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव यांना टोला

मुंबई : सत्तेसाठी कोणी २०१९ मध्ये  काय-काय केले हे सर्वांना माहीत आहे. वडिलांची छत्रछाया सोडून शत्रूशी हात मिळवणी केली. काही नेते टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात, पायर्‍यांवर चॅनेलचा बूम बघून धूम ठोकतात, असा टोला एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.  अडीच वर्षांत आम्ही केलेली कामे लक्षात घ्या आणि पुढील पाच वर्षांचा अंदाज घ्या. शाबासकी नको पण बदनामी करू नका, अशी विनंती शिंदे यांनी विरोधकांना केली.शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलग तीन दिवस अंदाजपत्रकी अधिवेशनाला हजेरी लावली. 
 
यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीकास्र सोडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी, धनंजय मुंडे, अबू आझमी, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्या विधानाप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता उद्धव यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उद्देशून बोलताना शिंदे म्हणाले की, तुम्ही आपल्या भाषणात आज इतके मुद्दे मांडलेत, तुमचे काय शेवटचे अधिवेशन आहे का? तुमच्या मित्रपक्षाने तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवला असला तरी आम्ही आहोत ना तुमचे मित्र, अशी मिश्कील टिप्पणीदेखील केली.

Related Articles