‘आव्हानांना संधी समजून कार्य केल्यास मनस्वी आनंदाची अनुभूती’   

प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करत असताना रोज नव्या आव्हानांना सामोर जावे लागते. पुणे शहरातील वाहनांची संख्या, वाहनांशी संबंधित कामाच्या फाइल्सचा डोंगर आणि रोजची कामे कार्यालय बंद होण्याच्या आधी संपविण्याचे आव्हान अशी ही नोकरी आहे. मात्र जबाबदारी स्वीकारून रोजची आव्हाने रोज पूर्ण करण्याचा मनस्वी आनंद मला या नोकरीतून मिळतो. अशी भावना प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी व्यक्त केली. 
 
शहर मोठे असले की, त्या शहरातील सर्व प्रकारच्या वाहनांची संख्याही मोठी असते. त्यात पुणे हे विभागीय कार्यालय आहे. त्यामुळे रोज पुणे आणि बारामती कार्यालयाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी लागते. रोजच्या कामाचे नियोजन करावे लागते. सहकारी अधिकारी व कर्मचार्‍यांकडून केलेल्या नियोजनानुसार कामे पूर्ण करून घ्यावी लागतात. बर्‍याच वेळा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास कामाचा ताण वाढत जातो. कारण या कार्यालयात येणारे वाहन चालक किंवा मालक हे सुट्टी घेऊन आलेले असतात. त्यांच्या वेळेत काम न झाल्यास त्यांच्या रोषाला अधिकारी म्हणून सामोरे जावे लागते. एक दिवसाचे काम ठप्प झाल्यामुळे पुढच्या दिवशीच्या कामाचा ताणही वाढणारा असतो. त्यामुळे तांत्रिक गोष्टींचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे ठरते. 
 
कामाच्या नियोजनासह बर्‍याच वेळा अधिकार्‍यांची पथके दिवस रात्र रस्त्यांवर काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही अधिकारी म्हणून आपलीच असते. आरटीओ कार्यालयील नोकरी म्हणजे खूप जबाबदारी. मात्र त्या तुलनेत शिकायलाही खूप मिळते. या कार्यालयात महिलांना काम करण्यासाठी खूप संधी आहेत. क्षेत्र कोणतेही असो रोजच्या कामाला आव्हान समजले की ते काम अवघड वाटते. मात्र त्याच कामाला संधी मानल्यास त्या कामाचा मनस्वी आनंद मिळतो. त्यामुळे महिलांनी कोणत्याही कामाला आव्हान न मानता, संधी समजून कार्य करावे, असा सल्लाही अर्चना गायकवाड यांनी दिला. 
-अर्चना गायकवाड,  प्रादेशिक परिवहन अधिकारी

Related Articles