ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर   

लखनौ : किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मंजूर न झाल्याने ममता कुलकर्णी या पदावर कायम राहणार आहेत.प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान २४ जानेवारी रोजी एका समारंभात ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णी यांच्या पट्टगुरु डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर काही नागरिकांनी खोटे आरोप केले होते, त्यामुळे ममतांनी १० फेब्रुवारी रोजी  महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा त्रिपाठी यांनी फेटाळला आहे. त्यामुळे ममता महामंडलेश्वर पदावर कायम असतील. 
 
ममतांनी या संदर्भात समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,  महामंडलेश्वर पदाचा माझा राजीनामा स्वीकारला गेला नाही. आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी मला कायम ठेवल्याबद्दल मी आभारी आहे.  
 
दरम्यान, बॉलिवूड गाजवणार्‍या ममता कुलकर्णी सिनेविश्वाला राम राम करून साध्वी झाल्या आहेत. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी तिला महामंडलेश्वर करण्यासाठी पिंडदान आणि पट्टाभिषेक केला होता. यानंतर ममताला श्रीयमाई ममता नंदगिरी हे नवीन नाव मिळाले. तेव्हापासूनच ममता महामंडलेश्वर होण्याचा मुद्दा चर्चेत आहे. 
 

Related Articles