त्रिवेणी संगमावर ४० कोटींहून अधिक भाविकांनी केले स्नान   

लखनौ : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात त्रिवेणी संगमावर स्नान करणार्‍या भाविकांच्या संख्येने ४० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर शुक्रवारी ४८ लाख भाविकांनी स्नान केले, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली. 
   
मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि बसंत पंचमी या तीन पवित्र अमृतस्नान सणांची सांगता होऊनही भारत आणि जगभरातून भाविक मोठ्या संख्येने स्नानासाठी येत आहेत. मौनी अमावस्येला अमृतस्नानासाठी सर्वाधिक गर्दी झाली होती, त्यावेळी आठ कोटी भाविकांनी स्नान केले होते. मकर संक्रांतीच्या अमृत स्नानात साडेतीन कोटी तर बसंत पंचमीच्या स्नानात दोन कोटी ५७ लाख तर ३ जानेवारी रोजी दोन कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. ३० जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी दोन कोटी, तर पौष पौर्णिमेला १.७ कोटी भाविकांनी स्नान केले.   
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या संगमात डुबकी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी प्रयागराजला संगमावरील पवित्र विधीत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. या महाकुंभाचा समारोप २६ फेब्रुवारीला 
होणार आहे.

Related Articles