बाजारात टोमॅटोचा सुकाळ   

आवक वाढल्याने दरात मोठी घसरण; शेतकरी हवालदिल 

पुणे : बाजारात मागील आठवडाभरापासून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोला प्रतिकिलोला ८ ते १५ रूपये दर मिळत आहे. या दरातून शेतकर्‍यांचा केवळ वाहतूक खर्च भागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोची २० रूपये किलोने विक्री केली जात आहे. 
 
मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात रोज ८ ते १० हजार कॅरेटची आवक होत आहे. इतर वेळी ४ ते ७ हजार कॅरेटची आवक होत असते. सद्य:स्थितीत पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नगर नाशिक या भागातून टोमॅटोची आवक होत आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील बहुतांश बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे सर्वत्र दर कमीच आहेत. परराज्यात स्थानिक आवक अधिक आहे. त्यामुळे परराज्यातूनही होणारी आवक मागणी थांबली असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. 
 
पावसामुळे टोमॅटोच्या पीकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे काही काळ टोमॅटोला बाजारात चांगला दर मिळाला. मात्र पावसानंतर मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोचे पीक सुमारे दोन महिन्यांनी काढणीला येते. आता एकाच वेळी टोमॅटो काढणीला आल्याने बाजारात आवक वाढली आहे. ही आवक फेबु्रवारी अखेरपर्यंत टिकून राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत दरात वाढ होणार नसल्याचा अंदाजही विलास भुजबळ यांनी व्यक्त केला. 
 
परराज्यातून मागणी नाही 
 
राज्यासह परराज्यातील बाजारपेठांमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सर्वत्र टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. याच कारणामुळे परराज्यातून होणारी मागणीही थांबली आहे. ही वाढलेली आवक महिनाअखेरपर्यंत कायम राहिल. त्यानंतर आवक घटली, तर दरात वाढ होऊ शकते. मात्र पुढील २० ते २५ दिवस हेच दर कायम राहतील अशी परिस्थिती आहे. 
- विलास भुजबळ, ज्येष्ठ आडते, मार्केटयार्ड. 

Related Articles