‘आप’च्या आमदारांना १५ कोटींचे आमिष   

संजय सिंह यांचा भाजपवर आरोप

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. अशातच ‘आप’चे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी भाजपवर गुरूवारी गंभीर आरोप केला. ‘आप’च्या सात आमदारांना प्रत्येकी १५ कोटींचे आमिष दाखविण्यात आले असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. यावर, भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल उद्या (शनिवारी) जाहीर होणार आहे. बहुतांश मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी दिल्लीत सत्तांतर अटल असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ ‘आप’ला सत्ता गमवावी लागणार असून भाजप अडीच दशकानंतर सत्तेत परतणार आहे. मात्र, मतदारांचा प्रत्यक्ष कौल कोणाच्या पारड्यात पडला, हे उद्या स्पष्ट होणार आहे.
 
सत्ताधारी ‘आप’ला भाजपने चुरशीची लढत दिली आहे. काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उतरवले असले तरी मुख्य लढत ‘आप’ आणि भाजप अशी आहे. सिंह यांनी काल पत्रकार परिषद घेताना भाजपवर गंभीर आरोप केले. ‘आप’च्या सात आमदारांना फोनवरुन भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकी १५ कोटींचे आमिष दाखविण्यात आले असल्याचे सांगितले. काहींनी आमने-सामने भेटण्याची तयारीदेखील दर्शविली असल्याचे ते म्हणाले. आम्ही आमच्या आमदारांना यापुढे अशा प्रकारचा दूरध्वनी आला तर तो जतन करावा. गुप्त ठिकाणी बैठक झाली तर त्याचे चित्रीकरण करावे, असे सांगितले असल्याचे सिंह म्हणाले.
 
भाजपने निकालापूर्वीच आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळेच भाजपकडून असे प्रयत्न सुरू असल्याचेही सिंह यांनी सांगितले.५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील ७० जागांसाठी ६०.१० टक्के मतदान झाले. २०२० मध्ये ६२.५९ टक्के मतदान झाले होते. मतांचा घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, हे उद्याच स्पष्ट होणार आहे. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी ‘आप’ने २०१३ मध्ये ३१, २०१५ मध्ये ६७, २०२० मध्ये ६२ जागा जिंकल्या होत्या. मागील दोन निवडणुकांत भाजपने अनुक्रमे ३ आणि ८ जागा पटकावल्या होत्या. तर, काँग्रेसला साधा भोपळादेखील फोडता आला नव्हता.

Related Articles