जुन्नर तालुक्यातील द्राक्षांची बांगलादेशात निर्यात   

बेल्हे, (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील द्राक्षांची बांगलादेशात निर्यात सुरू झाली असून बांगलादेशातील व्यापार्‍यांनी द्राक्षांची खरेदी बांधावर येऊन सुरू केली आहे. सध्या प्रतवारीनुसार द्राक्षाला प्रतिकिलो ११० ते १२५ रुपया दरम्यान भाव मिळत आहे. चवीला गोड, जांभळाच्या आकाराची, खाण्यास कुरकुरीत आणि आरोग्यवर्धक असलेल्या जम्बो द्राक्षाला बांगलादेशातील खवय्यांकडून विशेष पसंती मिळत आहे. मात्र, आयात शुल्क वाढीचा फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसत आहे.
 
जुन्नर तालुक्यात यंदा सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात बागांची छाटणी झाली होती. यावर्षी बदलत्या हवामानाचा परिणाम झाल्याने घड निर्मिती कमी झाली असून जम्बो द्राक्षाच्या वीस टक्के बागांमध्ये घड निर्मिती झाली नाही. मागील आठ दिवसांपासून १५ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान आगाद छाटणी झालेल्या शरद सीडलेस व जम्बो द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे.
 
जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रामुख्याने द्राक्ष जातींमध्ये जम्बो, नाना पर्पल, शरद, रेड ग्लोब, किंगबेरी, फ्लेम, क्रिमसन, आरा सिलेक्शन, सोनाका, थॉमसन सीडलेस, तास ए गणेश यांचे उत्पादन घेतात.  बांगलादेशातील व्यापार्‍यांनी बागेत येऊन द्राक्षाची खरेदी सुरू केली आहे. 
 
द्राक्षाला सध्या मिळणारा भाव समाधानकारक आहे. मात्र, काही बागांमध्ये जम्बो द्राक्ष मण्यांना क्रॅकिंगची समस्या दिसून येत असल्यामुळे एकरी सरासरी चार ते पाच टन निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन निघत आहे. अद्याप दुबई, श्रीलंका, मलेशिया या देशात द्राक्षाची निर्यात सुरू झाली नाही. चीन आणि इतर आखाती देशात निर्यात सुरू झाल्यास बाजारभावात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.
 
मागील हंगामात द्राक्षाचे पैसे बुडवल्याने एका व्यापार्‍यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यामुळे शेतकर्‍यांनी द्राक्षाची विक्री करताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणूक टाळण्यासाठी पैसे बँक खात्यात जमा करूनच माल द्यावा. व्यापार्‍याचे छायाचित्र, आधारकार्ड, मालवाहतूक होणार्‍या कंटेनरचा क्रमांक आदी माहिती संकलित करावी, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले. 

Related Articles