दुषीत पाण्यामुळेच जीबीएसची लागण   

राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिलेल्या अहवालात स्पष्ट

पुणे : शहरात गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा आजार दुषित पाण्यामुळेच होत असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यामुळे बाधितग्रस्त भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
  
गेल्या महिन्याभरापासून शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी आदी परिसरात जीबीएस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले. यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. हा आजार दुषित पाण्यामुळे, अन्नामुळे होत असल्याचा प्राथमिक अंदाज होता. महापालिकेकडून या भागातील पाण्याचे स्त्रोत, खासगी टँकर व्यावसायिक, आर ओ प्लांट व्यावसायिक आदी ठिकाणी पाण्याचे नमूने घेतले गेले. तसेच या भागातील मांस विक्रेत्यांकडून नमूने घेतले गेले. आजाराची बाधा झालेल्या रुग्णांचे शौच, लघवी, रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सदर नमूने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
  
तपासणीनंतर एनआयव्हीकडून अहवाल आणि महापालिकेला काही सूचना देण्यात आल्या. याविषयी अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘एनआयव्हीकडून आलेल्या अहवालानुसार जीबीएस आजार हा दुषित पाण्यामुळे होत असल्याचे स्पष्ट होत असुन, काही प्रमाणात प्राण्याच्या विष्ठेमुळे देखील तो होऊ शकतो. यापार्श्वभूमीवर महापालिकेने या भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी इतक्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका महिन्यात हे केंद्र उभे केले जाईल. 
  
तसेच एनआयव्हीकडून पाण्यांचे नमूने घेताना ते दोन लिटर इतके घ्यावेत, तसेच ते दोन महिने साठवून ठेवून त्याची पुन्हा तपासणी करावी अशा सूचना केल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून नमूने पाठविण्यासंदर्भात सहकार्य केले जात नसल्याची चिंता अहवालात व्यक्त केली आहे’. 
 
शहरातील आरओ प्लांट रडारवर  
  
जीबीएसचे रुग्ण बाधित क्षेत्रातील टँकर भरणा केंद्र तसेच विविध जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. असे असतानाच या भागातील आरओ प्लांटच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. या तपासणी अहवालातून ३० पैकी १९ आरओ प्लांटचे पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या प्लांटला टाळे ठोकण्यात आले आहे. यानंतर शहरातील आरओ प्लांट रडारवर आले आहेत. त्यामुळे फक्त बाधित भागातच नव्हे तर शहरातील प्रत्येक आरओ प्लांटच्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. 
 
टँकर चालकांवर कारवाईसाठी उदासीन
  
जीबीएस बाधित भागातील आरओ प्लांटचे पाणी दूषित आढळून  आले. त्यानंतर महापालिकेने तात्काळ आरओ प्लांटला टाळे ठोकले. मात्र टँकर चालकांवर कारवाईसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून उदासीनता दाखविली जात आहे. बहुतांश टँकर भरणा केंद्र हे राजकीय नेत्यांचे किंवा राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांचे असल्याने कारवाईसाठी पाणीपुरवठा विभाग धाडस दाखवत नसल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे. जीवाशी खेळ करणार्‍या टँकर चालकावर महापालिका खरच कारवाई करणार असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Related Articles