आठव्यांदा अंदाजपत्रक सादर करत सीतारामन यांनी घडविला इतिहास   

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सलग आठव्यांदा देशाचे अंदाजपत्रक सादर करुन इतिहास घडविला आहे. हे अंदाजपत्रक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि मध्यमवर्गासाठी केलेल्या कर कपातीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.
  
अर्थमंत्री सीतारामन या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमी १० अंदाजपत्रकाच्या विक्रमाच्या जवळ पोहोचल्या आहेत. मोरारजी देसाई यांनी १९५९ ते १९६४ या काळात सहा वेळा आणि १९६८ ते १९६९ या काळात अर्थमंत्री म्हणून चार वेळा अंदाजपत्रक सादर केले होते. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रणब मुखर्जी यांनी अनुक्रमे नऊ आणि आठ वेळा अंदाजपत्रक मांडले आहे. मात्र, सलग सर्वाधिक वेळा अंदाजपत्रक मांडण्याचा विक्रम सीतारामन यांच्या नावावर नोंद झाला आहे.
 
अंदाजपत्रक सादर करताना सर्वाधिक लांबलेले भाषण 
  
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२० मध्ये २ तास ४० मिनिटे केलेले भाषण हे आतापर्यंतचे सर्वाधिक लांबलेले अंदाजपत्रकीय भाषण होते. त्यावेळी सीतारामन यांनी भाषणाचे शेवटची दोन पाने वाचण्याआधीच थांबविले. 
सर्वात कमी कालावधीचे भाषण १९७७ मध्ये हिरूभाई मुलजीभाई पटेल यांनी सादर केलेले अंतरिम अंदाजपत्रकाचे भाषण केवळ ८०० शब्दांचे होेते. ते आतापर्यंतचे सर्वात छोटे भाषण आहे. 
 
अर्थमंत्र्यांच्या साडीची चर्चा
 
या अंदाजपत्रकावेळी देखील सीतारामन यांच्या साडीची जोरदार चर्चा होती. यंदा अंदाजपत्रकासाठी निर्मला सीतारमन यांनी खास साडी नेसली होती. ज्यामध्ये काही खास कलाकृतीही होती. याआधीही अंदाजपत्रकावेळी अर्थमंत्र्यांनी नेसलेल्या साड्यांची चर्चा झाली होती. यंदा अर्थमंत्र्यांनी सोनेरी जरी असलेली फिकट पांढर्‍या रंगाची मधुबनी साडी नेसली होती. माहितीनुसार, ही साडी त्यांना बिहारमध्ये राहणार्‍या दुलारी देवी यांनी दिली होती. दुलारी देवी यांना २०२१ चा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. दुलारी देवी यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अर्थमंत्र्यांना  भेट घेतली. ही खास साडी भेट दिली आणि अंदाजपत्रकाच्या दिवशी ती परिधान करण्याची विनंती केली होती.
 
यंदाचे भाषण १ तास १४ मिनिटे
  
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी देशाचे अंदाजपत्रक संसदेत सादर केले. निर्मला सीतारामन यांनी सुमारे एक तास १४ मिनिटे चाललेल्या अंदाजपत्रकाच्या भाषणामध्ये, युवा, शेतकरी, महिला, सेवाक्षेत्र, रोजगार, कर्ज आणि विशेष पॅकेज यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यादरम्यान, निर्मला सीतारामन यांनी काही शब्दांवर विशेष भर दिला. त्यामध्ये टॅक्स (कर) हा शब्द त्यांनी ५१ वेळा, तर टीडीएस/टीसीएस शब्दाचा उल्लेख २६ वेळा केला. त्यानंतर २२ वेळा कस्टम आणि टॅक्सपेयर (करदाते), २१ वेळा भारत, मेडिकल, रिफॉर्म आणि शेतकरी हे शब्द प्रत्येकी २० वेळा वापरले. 
 
राष्ट्रपतींकडून दही-साखर   
 
शनिवारी अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अंदाजपत्रकाची प्रत दिली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री सीतारामन यांना दही-साखर भरविले. या दोघींचा हा फोटो समाज माध्यमावर खूप व्हायरल झाला.

Related Articles